कुडाळ दि. 6 – गेल्या ११ दिवसांपासून मनोभावे उपासना करणाऱ्या सार्वजनिक नवरात्रैात्सव मंडळांनी गुरूवार दि.6 रोजी जंगी मिरवणुकीतून आदिशक्ती दुर्गादेवीला भक्तीमय वातावरणात निरोप दिला. दुपार पासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने तरूणाईच्या उत्साहावर काहीसे विरजन आले मात्र तरीही वरूणराजाचे आनंदात स्वागत करत पावसात चिंब भिजतच डीजे च्या तालावर ठेका धरत तरूणांनी मिरवणुक यशस्वीपणे पार पाडली. तरुणांसोबतच ठिकठिकाणी महिला, तरुणींनी आकर्षक दांडिया खेळून मिरवणुकीची रंगत वाढवली. सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवणाऱ्या उत्सवाचा शेवटही गोड व्हावा यासाठी युवक, ग्रामस्थांनी मिरवणुकतही शांततेचे दर्शन घडविले, यावेळी कुडाळ पोलिसांनी बंदोबस्तही ठेवला होता. दुपारी सुरू झालेली मिरवणुक रात्री उशिरापर्यत चालणार असून त्यांनतर विसर्जन केले जाणार आहे.
यंदाच्या नवरात्रोत्सवात कुडाळकरांनी अभूतपूर्व उत्साह अनुभवला. आदिशक्तीची स्थापना झाल्यापासून प्रत्येक सार्वजनिक मंडळाने सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम सादर केले. या उत्सवाचा शेवटही अतिशय उत्साहात करण्यासाठी मंडळांनी दोन दिवसांपासून नियोजन केले होते. गुरूवारी दुपारी 1 वाजेपासून काही मंडळांच्या मिरवणुकीस सुरुवात झाली. मंडळांनी स्वतंत्रपणे वाजत-गाजत व डीजेच्या तालावर थिरकत निरंजना नदी गाठून तेथे मूर्तीचे विसर्जन केले. इंदिरानगर येथील राजमाता नवरात्र उत्सव मंडळाची प्रथमता मिरवणुक निघाली त्यांनतर संध्याकाळी सात नंतर मुख्य बाजारपेठ मार्गावरून दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळ कुडाळ व मावळा प्रतिष्ठाण कुडाळ यांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली.
भव्य आणि सुबक अशा दुर्गामूर्तींची मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मिरवणूक मार्गावर गर्दी केली होती, दुर्गामाता की जय, उदं ग अंबे उदे ! अशा घोषणांनी कुडाळनगरीचा परिसर दणाणून गेला होता.