
कुडाळ दि. 30 – महू हातगेघर धरणग्रस्त व लाभधारक कृती समितीला आजिंक्यातारा- प्रतापगड साखर उद्योग समूहाचा तसेच संचालक मंडळ, तमाम शेतकरी , उस उत्पादक यांच्या वतीने पाठिंबा जाहीर करत असल्याचे निवेदन कारखान्याचे अध्यक्ष व कृती समितीचे सरचिटणीस सैारभबाबा शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिले आहे.

निवेदनात नमूद केल्या प्रमाणे जावली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून होऊ घातलेल्या कुडाळी प्रकल्पातील महू व हातगेघर धरणाचे काम गेल्या 30 वर्षापासून अत्यंत संथगतीने सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नाने या प्रकल्पाचे व कालव्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. परंतु तरीही उर्वरित दहा टक्के कामाबाबत प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराकडून जाणीवपूर्वक वेळ काढूपणा करण्यात येत आहे. हे काम तातडीने पूर्ण करून धरणाचे पाणीशेतकऱ्यांच्या शेतात लवकरात लवकर पोहोचण्यासाठी प्रशासनाने अंतिम तारीख जाहीर करावी यासाठी बुधवार दिनांक 03 सप्टेबर पासून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्त व लाभधारक कृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडत साखळी उपोषण व वेळप्रसंगी महू धरणातच जलसमाधी घेण्यात येणार आहे,

सदरचे आंदोलन हे खऱ्या अर्थाने कुडाळ व परिसरातील शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी मोलाचे ठरणार आहे, सदरचे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतात पाणी खळाळणार आहे परिनामी तालुक्यात उसाचे पिक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, त्याचा फायदा आपल्या हक्काच्या अजिंक्यातारा- प्रतापगड साखर उद्योग समूहाला व कारखान्याला होणार आहे, कारखानाच्या माध्यमातून आपल्या भागाचे किंबहूना संपूर्ण तालुक्याचे नंदनवन होणार आहे, व कै.लालसिंगराव काका शिंदे व कै. राजेंद्र भैय्या शिंदे यांच्या परिश्रमाने उभा राहिलेला आपला प्रतापगड सहकारी साखर कारखानाला गरजे एवढा अपेक्षित ऊस उपलब्ध होणार आहे तसेच तालुक्यातील शेतकरी वर्गाला नगदी पीक म्हणून ऊस करता येणार आहे व त्याला चांगला दर द्यायला आणि गाळप करायला हक्काचा कारखाना आपला आहे. तसेच उस पिकासह सर्वच शेतीसाठी याचा फायदा होणार असून शेतकरी खऱ्या अर्थाने समृध्द होणार आहे, हे सर्व घडण्यासाठी आपल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले महू हातगेघर धरण ह्याचे काम जे अंतिम टप्प्यात आले आहे ते पुर्ण करण्यासाठी व पाणी आपल्या शिवारात येण्यासाठी आपल्याला हा शेवटचा लढा ऊभा करायचा आहे व तो करण्यासाठी आजिंक्यतारा-प्रतापगड उद्योगसमुहाचा वतीने जाहीर पाठींबा देत असून पुर्ण समर्थन देखील या माध्यमातून देत आहे,ह्या आंदोलनाला कारखाना चे सर्व संचालक – सभासद – कामगार- अधिकारी – ऊस उत्पादक शेतकरी व सर्व घटकांचा जाहीर पाठिंबा आहे, महू व हातगेघर धरणाच्या लाभक्षेत्रातील 41 गावातील शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार असल्याने आपण सर्वांनीच या आंदोलनात सहभागी होऊन हा लढा जिंकण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, तसेच ३ सप्टेंबरच्या कुडाळ येथील जाहीर सभेला व ४ सप्टेंबरच्या सायगाव येथील रास्ता रोकोला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यानिमित्ताने कृती समितीचे सरचिटणीस म्हणून सौरभ बाबा शिंदे यांनी केले आहे





