
कुडाळ ता. 23 – ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे यांनी जावली तालुक्यातील मुंबईस्थित माथाडी कामगार व कष्टकरी जनतेसाठी स्थापन केलेल्या डी. एम. के .जावली सहकारी बँकेने दहा कोटी नफा मिळवल्याने आमच्या संचालक मंडळावर सभासदांनी टाकलेला विश्वास आज खऱ्या अर्थाने सार्थ ठरला आहे. संचालक मंडळ व अधिकारी कर्मचारी यांनी प्रामाणिक काम करून रिझर्व्ह बँकेच्या नियम आणि अटी शर्थींची पूर्तता करत बँकेची आर्थिकस्थिती भक्कम केली आहे म्हणूनच भविष्यात आपल्या जावली बँकेला शेड्युल्ड बँकेचा दर्जा नक्की मिळेल असा विश्वासही बँकेचे अध्यक्ष विक्रम भिलारे यांनी बोलताना व्यक्त केला.

डी. एम. के. जावली सहकारी बँकेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष विक्रम भिलारे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे नुकतीच संपन्न झाली, त्यावेळी तो बोलत होते, पुढे भिलारे म्हणाले आज बँकेचाएनपीए शून्य टक्के आहे. ए आय जमान्यात सभासदांच्या आणि ठेवीदारांच्या पैशाला कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून आय .टी. क्षेत्रात बँक नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारत मार्गक्रमण करत आहे. भविष्यात १ हजार कोटीचा टप्पा पार करण्याचे बॅकेचे उद्दीष्ट असल्याचा विश्वासही भिलारे यांनी व्यक्त केला. यावेळी सभेला माजी जलसंपदा मंत्री आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार सदाशिव सपकाळ, बँकेचे मार्गदर्शक वसंतराव मानकुमरे,उपाध्यक्ष चंद्रकांत दळवी, ज्येष्ठ संचालक चंद्रकांत गावडे, प्रकाश मस्कर, दत्तात्रय गावडे, हणमंतराव चवरे, शालिनी बँकेचे अध्यक्ष भानुदास जाधव, हिंदुराव तरडे, तानाजी शिर्के, भाजपाचे तालुकाध्यक्ष संदिप परामणे,बाजार समितीचे सभापती जयदिप शिंदे, आदी मान्यवर व संचालक मंडळ उपस्थित होते.

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, सर्व आव्हान पार करत जावली बँकेच्या संचालक मंडळाने,कर्मचार्यांनी प्रामाणिक काम करून बँकेच्या इतिहासात पहिल्यांदा दहा कोटी रुपये नफा मिळवला हे कौतुकास्पद आहे आम्ही बँकेच्या कामकाजात हस्तक्षेप करणार नाही मात्र चुकीचं काही केलं तर सहन करणार नाही, बँकेच्या कामकाजात सुधारणा करून कार्पोरेट लूकदेण्यासाठी प्रयत्न करावेत असेही ते म्हणाले,बँकेचे मार्गदर्शक वसंतराव मानकुमरे यावेळी बोलताना म्हणाले, आजच्या बँकिंग क्षेत्र स्पर्धेत काम करताना मोठी कसरत करावी लागत आहे, बँकेवर आर बी आय ने निर्बंध घातले होते आता ते निर्बंध उठवले आहेत. मोठ्या जिद्दीने बँकेच्या संचालक मंडळाने अधिकारी ,कर्मचारी यांनी बँकेला नफ्यात आणले आहे. यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनीही मार्गदर्शन केले. सभेच्या सुरुवातीला श्रध्दांजलीचा ठराव अजित कळंबे यांनी मांडला तर मागील सभेचे इतिवृत्तांत वाचन विश्वनाथ धनावडे यांनी केले तसेच बाळासाहेब भालेघरे यांनी अहवाल वाचन केले, तर ज्येष्ठ संचालक चंद्रकांत गावडे यांनी ताळेबंद सादर केला, नफा विभागणी प्रकाश मस्कर यांनी सादर केली तर वसंत तरडे, गणेश भोसले, उमिता रांजणे, विजय कदम, चंद्रकांत गवळी या संचालकांनी विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन केले त्याला सभासदांनी आवाजी मंजुरी दिली, वार्षिक सर्वसाधारण सभेला जावली, वाई, महाबळेश्वर सह मुंबई मधील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालक योगेश गोळे यांनी सुत्रसंचालन व स्वागत केले तर एकनाथ ओंबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.




