
कुडाळ ता.19 – जावली तालुक्यातील एकमेव मोठी सहकारी संस्था असलेला प्रतापगड साखर कारखाना ऊस पुरवठादार, शेतकरी,सभासद आणि कामगार यांच्या लाखमोलाच्या सहकार्यातून अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योग समूहाचा दुसरा गळीत हंगाम यशस्वी झाला, 92 दिवसांच्या या हंगामात कारखान्याने 1 लाख 91 हजार मे. टन उसाचे गाळप केले असून अंदाजे सव्वा दोन लाख साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे, अनेक अडचणींवर मात करून कारखाना पुन्हा उभा राहिला असून ऊस पुरवठादार शेतकरी, सभासद आणि कामगारांनी असेच सहकार्य ठेवल्यास आज ना उद्या, दोन- पाच वर्षांनंतर प्रतापगड कारखाना हा सातारा जिल्ह्यातील इतर
कारख्यांन्याच्या तुलनेत स्पर्धात्मक व उच्चतम दर देणारा कारखाना असा नावलौकिक मिळवेल, असा विश्वास अजिंक्यतारा- प्रतापगड साखर उद्योग समूहाचे मार्गदर्शक, व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
यांनी बोलताना व्यक्त केला.

सोनगाव ता.जावळी येथील प्रतापगड सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर यंदाच्या हंगामाचा सांगता समारोह व सव्वा दोन लाख साखर पोत्यांचे अशा संयुक्तीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी नामदार
भोसले बोलत होते, प्रतापगड कारखाना अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने गतवर्षी सुरु करण्यात आला होता. प्रतापगड कारखान्याचा दुसरा गळीत हंगाम यशस्वीपणे संपन्न झाला. हंगामाची सांगता अंतिम ११ साखर पोत्यांचे पूजन करून करण्यात आली.

यावेळी अधिकारी व कामगारांचा सत्कारही करण्यात आला. याप्रसंगी नामदार शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. कार्यक्रमाला प्रतापगड कारखान्याच्या संस्थापक संचालिका श्रीमती सुनेत्रा शिंदे, प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, अजिंक्यताराचे अध्यक्ष यशवंत साळुंखे, उपाध्यक्ष नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, राजेंद्र भिलारे, दोन्ही कारखान्याचे सर्व संचालक, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.नामदार शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले, यावर्षी संपूर्ण जिल्हात ऊसाचे क्षेत्र कमी होते तरी पण दराची स्पर्धा करून 92 दिवस हंगाम यशस्वी करून 18.58 रिकव्हरी मिळवून हंगाम यशस्वी केला, यावर्षी उसाच्या कमी क्षेत्र असल्याने मोठे गाळप करता आले नाही त्यामूळे तोटा सहन करून यावर्षीचा हंगाम संचालक मंडळाने चालवला आहे, कारखाना बंद ठेवणे व्यवहारिक न्हवते म्हणून कारखाना सुरू ठेवला होता, यंदा जरी आपण तोट्यात असलो तरी पुढच्या वर्षी मात्र पूर्ण क्षमतेने कारखाना चालवून किमान 5 लाख गाळपाचे आपण उद्दिष्ट ठेवले आहे, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, व पुढील हंगाम यशस्वी केला पाहीजे
कारखान्याने दोन हंगामात मिळून एकूण 19 कोटीचे कर्ज फेडले आहे, ही जमेची बाजू आहे. भविष्यात सर्व कर्ज भरून व्याज कमी करण्याचा प्रयत्न संचालक मंडळाचा आहे. कर्मचाऱ्यांच्या अनमोल सहकार्यामुळेच प्रतापगड कारखाना पुन्हा सुरु झाला आहे. स्वर्गीय लालसिंग काकांचे स्वप्न खऱ्या अर्थाने आज पूर्ण झाले आहे. आपण सर्वांनी मिळून सांघिक पणे एकत्रित काम केले आणि त्याचे फलित म्हणून जावलीतील शेतकऱ्यांचे हक्काचे सहकार मंदिर पुन्हा उभे राहिले. आपल्याला अजून खूप पुढे जायचे आहे. त्यामुळे पुढील हंगामातही सर्वांनी असेच सहकार्य कायम ठेवावे. आज ना उद्या, पुढील दोन- पाच वर्षात प्रतापगड कारखाना जिल्ह्यातील सर्वात जास्त दर देणारा कारखाना अशी ओळख कारखान्याची झाल्याशिवाय राहणार नाही.असे आवाहनही नामदार शिवेंद्रसिंहराजेंनी केले.

दरम्यान, प्रतापगडचे अध्यक्ष सौरभ शिंदे म्हणाले, बंद पडलेला कारखाना बाबाराजेंच्या साथीमुळे पुन्हा उभा राहिला आहे. शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या सहकार्याने कारखाना यशस्वी गाळप करू शकला. अनेक अडचणी आल्या पण, बाबराजेंच्या पाठिंब्यामुळे सलग दोन हंगाम कारखान्याने यशस्वी केले. व जास्त गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याने गाठले. पुढेही याच पद्धतीने प्रतापगड जिल्ह्यातील अग्रेसर कारखाना म्हणून नावारूपाला आणन्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आगामी हंगामही यशस्वीपणे पार पाडू असेही शिंदे यांनी नमूद केले, यावेळी साखर पोती चे पूजन करून हंगामाची सांगता करण्यात आली. उपाध्यक्ष नामदेव सांवत यांनी आभार मानले

