कुडाळच्या महाराजा शिवाजी हायस्कूल मध्ये चाळीस वर्षानंतर भेटले वर्गमित्र- १९८५ सालच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

कुडाळ तां .१९- जावली तालुक्यातील कुडाळ व पंचक्रोशीतील महाराजा शिवाजी हायस्कूल कुडाळ मध्ये सन 1985 साली एसएससी ला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन साजरा केला स्नेहमेळावा. या स्नेहमेळाव्यासाठी 1985- 86 चे वर्गमित्र एकत्र आले होते. त्यांचे गुरुजन श्री माने सर व श्री सावंत सर यांना निमंत्रित करण्यात आले होते.

यावेळी विद्यालयाच्या आरएसपी विद्यार्थ्यांनी संचलन करत शिक्षक व विद्यार्थ्यांना स्टेज पर्यंत सन्मानाने आणले आणि विवेकानंद सप्ताहाचा समारोप असल्याने या सर्व गुरुजन व माजी विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या शुभहस्ते स्वामी विवेकानंद, डॉ. बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

राष्ट्रगीत प्रार्थना म्हणण्यात आली व त्यानंतर विद्यालयाच्या इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थिनींनी ढोलावरील अडी डाव खेळून कार्यक्रमाला सुरुवात केली.
या स्नेह मेळाव्याचे प्रास्ताविक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री तरडे दत्तात्रय मनोहर यांनी मानले व सर्व माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचे काम केले.

यावेळी माजी विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी शाळेबद्दल व शिक्षकांबद्दल चे ऋण व्यक्त केले.श्री सावंत सर यांनी प्रामाणिकपणे जगावं, सतत हसत राहावं, आयुष्यामध्ये कधीही ताण घेऊ नये, दुःख करत बसू नये असे मत व्यक्त केले.श्री माने सर यांनी त्यावेळीची शिक्षण पद्धत, विद्यार्थ्यांना केलेली मदत, गरीब विद्यार्थ्यांना उभे करणे, शाळेतील कामकाज याबद्दल आठवणींना उजाळा दिला.माजी विद्यार्थ्यांनी उत्तरदायित्व म्हणून विद्यालयाला दहा हजार एक रुपयाचे भरीव मदत करून पुढच्या वर्षी पुन्हा शाळेच्या अडचणींसाठी आम्ही उभे राहू असे आश्वासन दिले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवनाथ जाधव व मंगल करंजे यांनी विशेष प्रयत्न घेतले. यावेळी विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती सूर्यवंशी मॅडम श्रीमती कुंभार मॅडम व कुमारी सासवडे मॅडम उपस्थित होत्या.
