
कुडाळ ता.27 – कुडाळ ता. जावळी येथे सोमवार ता. 26 पासून श्री दुर्गामाता दौडची सुरवात मोठया उत्साहात सुरु
झाली असून, ही दौड संपूर्ण महाराष्ट्रात दरवर्षी गावोगावी घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत काढली जाते. छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छ संभाजी महाराज यांचे कार्य अखंड ज्वलंत रहावे,त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचावे , प्रत्येकाने देव, देश आणि धर्माविषयी प्रेम अंतःकरणामध्ये जपले पाहिजे यासाठी सर्व धारकरी भल्या पहाटे उठुन गाव प्रदक्षिणा मारून ही दुर्गादौड काढत असतात. या दौडमध्ये गावातील शेकडो धारकरी सहभागी होतात.

छत्रपती शिवाजी महाराज की जय… भारतमाता की जय…अशा जयघोषात (सोमवारी ता. 26 ) सकाळी 6 वाजता येथे शिवप्रतिष्ठानचे शस्त्रपूजन झाले. श्री पिंपळेश्वर श्री वाकडेश्वर मंदिरापासून ते तुळजाभवानी मंदिर कदम आळी अशी संपुर्ण गावातून दुर्गामाता दौड आयोजित करण्यात आली होती. टोकावर लिंबू टोचलेल्या तलवारी हातात घेऊन डोक्यावर भगवे फेटे बांधलेल्या युवक-युवतींच्या या दुर्गामाता दौडचे विविध ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत झाले. तरुणपिढीमध्ये देशप्रेम व धर्मप्रेम रुजावे, तसेच छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा वारसा त्यांच्याकडून जपला जावा यासाठी श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवात मागील अऩेक वर्षांपासून राज्यभरात दुर्गा माता दौड होते. कुडाळमध्येही यंदाच्या नवरात्रोत्सवात दुर्गा माता दौड उपक्रम सुरू झाला. नवरात्रीच्या काळात रोज सकाळी साडेसहा वाजता युवक भगवा ध्वज हातात घेऊन श्री पिंपळेश्वर श्री वाकडेश्वर मंदिरापासून ही दुर्गा माता दौड काढून तुळजाभवानी देवीमंदिरात तिचा समारोप होत आहे. कुडाळसह जावळी तालुक्यातील अनेक गावांगावांत हा उपक्रम राबवला जात आहे. या दुर्गा माता दौड उपक्रमाचा समारोप विजयादशमीला (दसऱ्याला) होणार आहे.



