जावळीराजकीयसहकार

प्रतापगड आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ऊस देऊन सहकार्य करावे – आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले : सोनगावला अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योग समूहाच्या वतीने बॉयलर अग्नी प्रदीपन संपन्न – विरोधकांचाही घेतला खरपूस समाचार

कुडाळ ता. 11 – जावली तालुक्यातील कृषी उद्योग क्षेत्राला चालना देणारा प्रतापगड सहकारी साखर कारखाना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहकार्य अत्यावश्यक असून कारखान्याला जास्तीत जास्त ऊस देऊन आगामी गळीत हंगाम यशस्वी करावा, भविष्यात प्रतापगड स्वबळावर चालावा ,व स्वयंपूर्ण व्हावा त्यादृष्टीनेच अजिंक्यतारा चे व्यवस्थापन कार्यरत असल्याचे प्रतिपादन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. यावेळी त्यांनी विरोधक हे कर्तुत्व शून्य असून त्यांना शून्यावरच ठेवा असा निशाणा अमित कदम यांच्यावर साधला.

अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योग समूहाच्या गळीत हंगामासाठीचे बॉयलर अग्नी प्रदीपन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात आमदार भोसले बोलत होते. कार्यक्रमाला कारखान्याच्या माजी अध्यक्षा श्रीमती सुनेत्रा शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, अजिंक्यतारा कारखान्याचे अध्यक्ष यशवंत साळुंखे, जिल्हाबँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, उपाध्यक्ष ऍड.शिवाजीराव मर्ढेकर, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, राजेंद्र भिलारे, जितेंद्र शिंदे, जयदीप शिंदे, एकनाथ ओंबळे, हणमंत पार्टे, तानाजी शिर्के, मच्छिंद्र मुळीक, आदी मान्यवर उपस्थित होते. 

आमदार भोसले म्हणाले, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लादून विरोधकांनी कारखान्याला आर्थिक अडचणीच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न केला. परंतु सभासदांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. प्रतापगड साखर कारखान्याला सुरुवातीपासूनच अनेक अडचणींचा सामना करावा लागला  होता. हा कारखाना सुरळीत सुरू राहावा यासाठीच अजिंक्यतारा कारखान्याने मदतीचा हात दिला आहे. हा कारखाना लवकरात लवकर कर्जमुक्त होऊन स्वबळावर चालावा ऊस उत्पादक शेतकरी सभासद, कामगार यांच्यासह सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. गतवर्षीच्या गळीत हंगामात सव्वातीन लाख मॅट्रिक टन  उसाचे गाळप करून प्रतापगडचा गळीत हंगाम यशस्वी केला आहे. गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे उसाचे क्षेत्र घटले आहे अशा परिस्थितीत यावर्षीचा गळीत हंगाम यशस्वी पार पाडणे हे आव्हानात्मक आहे. त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. यावर्षी उसाचे क्षेत्र कमी असल्याने बाहेर कारखाने येथील ऊस नेण्याचा प्रयत्न करतील. परंतु ज्यावेळी त्यांच्या क्षेत्रातील ऊस उत्पादन वाढेल त्यावेळी ते इकडे फिरकणार नाहीत. त्यामुळे आपल्या हक्काचा प्रतापगड कारखाना सुरू राहणे आवश्यक आहे. आगामी निवडणुकीत आपला विजय निश्चितच आहे. तरीसुद्धा विरोधकांना कमी लेखून कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये. आपल्या गावातून जास्तीत जास्त मतदान  आपल्याला होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्या प्रगतीच्या आड येणाऱ्या विरोधकांना थारा देऊ नये असे आवाहन आमदार भोसले यांनी केले.

प्रतापगडचे अध्यक्ष सैारभ शिंदे म्हणाले, प्रतापगड सहकारी साखर कारखाना हा जावली तालुक्याचा मानबिंदू आहे. हा कारखाना सक्षमपणे चालवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याच्या आवश्यकता आहे.माजी आमदार लालसिंगराव शिंदे काका व राजेंद्र शिंदे यांनी कारखान्याच्या माध्यमातून जावली तालुक्याचे विकासाचे स्वप्न पाहिले तसेच कारखान्याच्या माध्यमातून शेकडो तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली काकांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी या कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावे.आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आव्हानही त्यांनी केले.  यावेळी वसंतराव मानकुमरे, रवींद्र परामणे, प्रशांत तरडे,मच्छिन्द्र मुळीक,अरुणा शिर्के,समाधान पोफळे, यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले. संचालक राजेंद्र फरांदे पाटील यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button