कुडाळ त.१४ – सातारा- जावली मतदारसंघात पर्यटनवाढीसह रोजगारनिर्मितीला प्राधान्य देऊन विविध महत्वकांक्षी प्रकल्प राबवणाऱ्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून पाचवड,कुडाळ मार्गे त मेढा आणि मेढा ते शेंबडी या रस्त्याच्या सुधारणेसाठी तब्बल ४५१.६० कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. यामुळे सातारा आणि जावली तालुक्यातील पर्यटनाला खूप मोठी चालना मिळणार असून जनतेचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होणार आहे. या रस्त्यामुळे कुडाळ या मोठ्या बाजारपेठेला मोठा फायदा होणार आहे,राज्य शासनाच्या हॅम योजनेतून हा निधी मंजूर झाला असून याबद्दल आमदार. शिवेंद्रसिंहराजेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
आमदर शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार आणि पाठपुराव्यातून राष्ट्रीय महामार्ग ४ ते पाचवड, कुडाळ, मेढा, कोळघर, अंधारी, फळणी, मुनावळे, वाघळी, शेंबडी या रस्त्याची सुधारणा करणे (भाग पाचवड ते मेढा आणि भाग मेढा ते शेंबडी) या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी (लांबी ५६.४५ कि.मी.) ४५१.६० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया नुकतीच पार पडली असून लवकरच या रस्त्याच्या कामाला प्रारंभ होणार आहे. जसे सातारा ते कास पठार या रस्त्याचे दर्जेदार काम करण्यात आले आहे त्याच पद्धतीने याही रस्त्याचे काम होणार आहे. त्यामुळे या रस्त्याच्या आजूबाजूच्या जनतेचे आणि पर्यटकांचे दळणवळण सुकर होणार आहे तसेच वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे. हाच रस्ता पुढे शेंबडी पासून कोकणाला जोडला जाणार असल्याने कास, बामणोली, मुनावळे, वासोटा, महाबळेश्वर, पाचगणी येथील पर्यटन वाढणार आहे त्याशिवाय या प्रस्तावित मार्गाने पर्यटकांना थेट कोकणात कमी वेळेत आणि कमी खर्चात जाता येणार आहे. त्यामुळे सातारा आणि जावली तालुक्यातील पर्यटनवाढीला मोठी चालना मिळणार आहे.
पाचवड ते मेढा कि.मी. ४०/५५० ते ५९/९५० आणि मेढा ते शेंबडी कि.मी. ०/०० ते ३७/१०० या रस्त्याची सुधारणा करण्याचे काम आता मार्गी लागणार आहे. त्यामुळे या भागातील पर्यटन वाढीच्या दृष्टीने महत्वाचा अडसर दूर होणार आहे. नुकतेच मुनावळे येथील जागतिक दर्जाच्या जलपर्यटन केंद्राचा शुभारंभ केला आहे. आगामी काळात सातारा- जावली मतदारसंघात जास्तीत जास्त पर्यटन वाढ व्हावी आणि त्यातून रोजगारनिर्मिती व व्यवसाय वृद्धी व्हावी या दृष्टीने आवश्यक असणारी कामे मार्गी लावणारा आहे, असे आ. शिवेंद्रसिंहराजेंनी यानिमित्ताने स्पष्ट केले आहे.