कुडाळ ता. 15- अजिंक्यतारा- प्रतापगड साखर उद्योग समूहाच्या प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम जोमाने सुरु असून गाळपास आलेल्या उसाला प्रतिटन ३००० रुपये याप्रमाणे होणारी सर्व रक्कम कारखान्याने संबंधित उसपुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग केली असल्याची माहिती उद्योग समूहाचे मार्गदर्शक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे.
अजिंक्यतारा- प्रतापगड साखर उद्योग समूहाच्या माध्यमातून जावली तालुक्यातील बंद अवस्थेत असलेला प्रतापगड कारखाना या हंगामापासून सुरु करण्यात आला आहे. या कारखान्याचा गळीत हंगाम जोमाने सुरु असून दि. ५ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत २४७५५.८५६ मे. टन उसाचे गाळप झाले. या गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ३००० रुपये याप्रमाणे होणारी ऊस बिलाची रक्कम ७ कोटी ४२ लाख ६७ हजार ५६८ रुपये एवढी रक्कम संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या बँक शाखेशी संपर्क साधून आपले बिल जमा झाल्याची खात्री करून घ्यावी. चालू असलेल्या हंगामात कारखान्याची सर्व यंत्रणा सक्षमपणे कार्यरत असून नियोजनानुसार ऊस तोडणी आणि गाळप सुरु आहे. शेतकऱ्यांनी नोंद केलेला संपूर्ण ऊस प्रतापगड कारखान्याला घालून हंगाम यशस्वी करण्यासाठी आणि प्रतापगड कारखाना पुन्हा सक्षम होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे