कुडाळ ता. 25 – मुंबई येथील २६/११ दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्याला पकडण्यात महत्वाची भूमिका बजावलेले शहीद पोलिस कर्मचारी तुकाराम ओंबळे यांच्या स्मृतिदिनी त्यांचे भव्य स्मारक बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यांच्या स्मृतिदिनी ही त्यांना आदरांजली आहे. केडंबे येथे हे स्मारक बांधण्यात येणार असून, यासाठी ७१ कोटींचा निधी प्रस्तावित आहे. याबाबत पुढील आठवड्यात निर्णय होणार -असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सह संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी ना. शिंदे यांनी शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाबाबत चर्चा केली. तसेच जाग्यावरूनच मुख्यमंत्र्यांनी प्रधान सचिवांशी संपर्क साधून स्मारकाची फाईल तात्काळ मुख्यमंत्री कार्यालयात पाठवण्याचे आदेश दिले. स्मारकासाठी ७१ कोटींचा निधी प्रस्तावित आहे. पुढील विधिमंडळ अधिवेशनात स्मारकासाठी निधी मंजूर केला जाईल. शहीद ओंबळे यांच्या स्मृतिदिनी हीच त्यांना आदरांजली ठरेल. स्मारक झाल्यानंतर मी स्वतः भूमिपूजनाला केडंबे येथे येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.