
कुडाळ ता. 24 – सोनगाव ता. जावळी येथील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचा (अजिंक्यतारा -प्रतापगड साखर उद्योग समूहाचा) सन 2023-24 चा गाळप हंगाम सध्या जोमाने सूरू आहे, आपला हक्काचा कारखाना सुरू झाल्याने स्थानिकांसह बाहेरूनही चांगल्या प्रमाणात ऊस गाळपासाठी येत आहे मात्र काही विघनसंतोषी प्रवृत्ती
कडून कारखाण्याबाबत चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत,त्याबाबत कारखाना व्यवस्थापनाने जाहीर निवेदन प्रसिद्धीस दिले असून, त्यानुसार
प्रतापगड सहकारी साखर कारखाना लि. सोनगांव-करंदोशी च्या सर्व ऊस उत्पादक सभासदांना तसेच बिगर सभासदांना सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, सन २०२३-२४ च्या गळीत हंगामासाठी ऊस पुरवठा करणा-या सभासदांची ऊस बिलातून कोणत्याही प्रकारची शेअर्स (भागाची रक्कम कपात करुन घेतली जाणार नाही. काही अपप्रवृत्तींना प्रतापगड सह साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असलेला बघवत नाही. अशी विघ्नसंतोषी लोक अफवा पसरवण्याचे काम करीत आहेत. वास्तविक प्रतापगड कारखान्याच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचे आर्थिक चक्र गतिमान झालेले आहे व तालुक्यातील युवकांना रोजगार निर्मिती झालेली आहे. आपल्या तालुक्यातील विकासात्मक वाटचाल चालू ठेवण्यासाठी सर्व ऊस उत्पादक सभासदांनी कोणत्याही अफवेला बळी न पडता आपला असणारा संपूर्ण ऊस सोनगाव येथील अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योगाला पाठवावा हि विनंती. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे,

यावेळी माहिती देताना कारखान्याचे अध्यक्ष म्हणाले, प्रतापगड हा कारखाना जावलीतील सभासद शेतकऱ्यांचा हक्काचा कारखाना आहे तो पुन्हा एका नव्या उमेदीने सुरू झाला आहे, अनेक अडचनी वर मात करून , यंदाचा गाळप हंगाम संचालक मंडळ यशस्वी करणार असून सर्वांच्या सहकार्याने प्रतापगड कारखाना पुन्हा भरारी घेईल, व येथील शेतकऱ्यांना उभारी येईल असा विश्वास व्यक्त करत जावली तालुक्यातील सर्व ऊस उत्पादकांनी प्रतापगडलाच उस घालून शेतकरी आणि कामगारांचे भविष्य उज्वल करण्यासाठी योगदान द्यावे,
येथील शेतकरी आर्थिक सक्षम झाला पाहिजे याच हेतूने आम्ही कारखाना सुरु केला असून हा प्रयत्न यशस्वी होण्यासाठी तालुक्यातील सर्वांनी आपला ऊस या कारखान्याला पुरवावा हीच विनंती आहे. कारखान्याचे कामकाज राजकारण विरहित असून गटतट न पाहता सर्वांचाच ऊस घेतला जाणार आहे.

आजची दुष्काळाची परिस्थिती पाहता अनेक अडचणी आहेत. आपण शून्यातून सुरुवात करत आहोत. ऊस दराच्या बद्दल कोणीही चिंता करू नये. फक्त तुमचे सहकार्य कायम ठेवा, सर्वांच्या साथीने हा कारखाना सक्षम करूया, असेही सौरभ शिंदे यांनी यानिमित्ताने आवाहन केले आहे

