कुडाळ ता.२ – स्वर्गिय लालसिंगराव शिंदे, व स्वर्गीय राजेंद्र भैय्या यांनी प्रतापगड कारखान्याची उभारणी केली, कारखाना चालवण्याचा प्रयत्न केला. आज हे दोघेही नेतृत्व आपल्यात नाहीत पण, कारखाना इथेच आहे. हा कारखाना जावलीतील सभासद शेतकऱ्यांचा हक्काचा कारखाना आहे तो पुन्हा एका नव्या उमेदीने सुरू झाला आहे, अनेक अडचणी असल्या तरी, यंदाचा गाळप हंगाम संचालक मंडळ यशस्वी करणार असून सर्वांच्या सहकार्याने प्रतापगड कारखाना पुन्हा भरारी घेईल, व येथील शेतकऱ्यांना उभारी येईल असा विश्वास व्यक्त करत जावली तालुक्यातील सर्व ऊस उत्पादकांनी प्रतापगडलाच उस घालून शेतकरी आणि कामगारांचे भविष्य उज्वल करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
सोनगाव ता. जावळी येथील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचा (अजिंक्यतारा -प्रतापगड साखर उद्योग समूहाचा) सन 2023-24 चा गाळप हंगामाचा शुभारंभ सोहळा गव्हाणीत मोळी टाकून मोठ्या उत्साहात करण्यात आला. यावेळी श्री भोसले बोलत होते. यावेळी कारखानाच्या माजी अध्यक्षा श्रीमती सुनेत्रा शिंदे, विद्यमान अध्यक्ष सैारभबाबा शिंदे, वसंतराव मानकुमरे, उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, अजिंक्यताराचे अध्यक्ष यशवंत साळुंखे, उपाध्यक्ष नामदेव सावंत, जिवाजी मोहिते, राजेंद्र भिलारे, अंकिता शिंदे, माजी सभापती अरुणा शिर्के, मोहन शिंदे, हणमंतराव पार्टे, जयदीप शिंदे, बुवासाहेब पिसाळ, रवी परामणे आदी मान्यवरांसह दोन्ही कारखान्याचे सांचालक उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सभासद शेतकऱ्यांच्या पैश्यातून हा कारखाना उभा राहिला आहे. कारखान्याचा इतिहास सर्वांना माहिती आहे. कारखान्याचे मालक सभासद – शेतकरीच आहेत आम्ही फक्त केअर टेकर म्हणून काम करत आहोत. हा कारखाना पुन्हा उभा राहणे व सुरू होणे गरजेचे आहे, येथील शेतकरी आर्थिक सक्षम झाला पाहिजे याच हेतूने आम्ही कारखाना सुरु केला असून हा प्रयत्न यशस्वी होण्यासाठी तालुक्यातील सर्वांनी आपला ऊस या कारखान्याला पुरवावा हीच विनंती आहे. कारखान्याचे कामकाज राजकारण विरहित असून गटतट न पाहता सर्वांचाच ऊस घेतला जाणार आहे.
आजची दुष्काळाची परिस्थिती पाहता अनेक अडचणी आहेत. आपण शून्यातून सुरुवात करत आहोत. ऊस दराच्या बद्दल कोणीही चिंता करू नये. इतर कारखान्यांपेक्षा आपणही दर देण्यासाठी कमी पडणार नाही याची खात्री मी देतो. अत्यंत काटकसरीने आपण कारखाना चालवणार असून फक्त तुमचे सहकार्य कायम ठेवा, सर्वांच्या साथीने हा कारखाना सक्षम करूया, असेही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. अध्यक्ष सैारभबाबा शिंदे म्हणाले, तालुक्याचा हक्काचा कारखाना पुन्हा एकदा सुरू होत आहे हे तालुक्यासाठी सुवर्ण क्षण आहे. आता हा कारखाना सक्षमपणे चालवा यासाठी जास्तीत जास्त उसा आपल्याचा कारखान्याला घालून सर्वांनी सहकार्य करावे. आजच्या नव्या सुरूवातीमध्ये अजिंक्यतारा कारखान्याचे मोलाचे योगदान आहे, कारखान्यामुळे सर्वच चक्र गतीमान होणार असून शेतकरी, कामगार, व सभासद सर्वांचेच आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी कारखान्याला सर्वांनी सहकार्य करावे. वसंतराव मानकुमरे यांनीही मनोगत व्यक्त करूनसहकारातील नव्या पर्वास शुभेच्छा दिल्या, उपाध्यक्ष मर्ढेकर यांनी प्रास्ताविक केले. नामदेव साळुंखे यांनी आभार मानले.