कुडाळ ता.15 – जावळीच्या सहकाराचा मानबिंदू म्हणून आोळख असलेला व जावळीतील जनतेच्या हक्काचा असणारा प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचा (अजिंक्यतारा -प्रतापगड साखर उद्योग समूहाचा) सन 2023-24 चा गाळप हंगाम शुभारंभ सोहळा गुरूवार ता. 2 नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक 10 वाजता सोनगाव ता.जावळी येथील कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभबाबा शिंदे यांनी दिली आहे.
सातारा -जावळी मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच कारखानाच्या माजी अध्यक्षा श्रीमती सुनेत्रा शिंदे व विद्यामान अध्यक्ष सैारभबाबा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच कुडाळ, आनेवाडी, बामणोली, सोनगाव, खर्शी, आखाडे, रिटवली आदी तालुक्यातील विविध गावातील ज्येष्ठ सभासदांच्या शुभहस्ते गाळप हंगाम शुभारंभ संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमास तालुक्यातील शेतकरी सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रतापगड सहकारी साखर कारखानाचे अध्यक्ष सौरभबाबा शिंदे यांनी केले आहे.
गेल्या काही वर्षापासून प्रतापगड कारखाना बंद आहे मात्र सातारा -जावळी मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सहकार्याने व कारखान्याचे अध्यक्ष सैारभ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना पुन्हा एकदा नव्या जोमाने सूरू होणार असल्याने साहजिकच जावळीतील जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत, साखर कारखाना म्हणजे ग्रामीण भागाच्या आर्थिक उन्नतीचा कणा आहे. जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने प्रतापगड कारखाना सुरू होणे गरजेचे होते. हा कारखाना सुरू झाल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न मार्गी लागणार असून त्यांच्या आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे, कारखान्याच्या सन २०२३- २०२४ च्या गळीत हंगामाकरिता यंत्रसामग्री देखभाल, दुरुस्ती आदी सर्व कामे पुर्णत्वास गेली असून गुरूवारी प्रत्यक्षात कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरूवात होत आहे.