कुडाळ ता.15 – जावळीच्या सहकाराचा मानबिंदू म्हणून आोळख असलेला व जावळीतील जनतेच्या हक्काचा असणारा प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचा सन 2023-24 चा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा सोमवार ता.16 आँक्टोंबर रोजी सकाळी ठीक ११ वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभबाबा शिंदे यांनी दिली आहे.
सातारा -जावळी मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच कारखानाच्या माजी अध्यक्षा श्रीमती सुनेत्रा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच व्हाईस चेअरमन अँड. शिवाजीराव मर्ढेकर, सौ.छायाताई शिवाजीराव मर्ढेकर या उभयतांच्या शुभहस्ते बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमास तालुक्यातील शेतकरी सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रतापगड सहकारी साखर कारखानाचे चेअरमन सौरभ बाबा शिंदे यांनी केले आहे. गेल्या काही वर्षापासून प्रतापगड कारखाना बंद आहे मात्र कारखान्याचे अध्यक्ष सैारभ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच हा कारखाना जोमाने सूरू होणार असल्याने साहजिकच जावळीतील जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत, कारखान्याच्या सन २०२३- २०२४ च्या गळीत हंगामाकरिता यंत्रसामग्री देखभाल, दुरुस्ती आदी सर्व कामे पुर्णत्वास गेली असून प्रतापगडच्या गळीत हंगामाची पूर्वतयारी म्हणून बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा सोमवारी होत आहे.