कुडाळ ता. 27 -जावली तालुक्यातील सर्वासामान्य जनतेला अडीअडचणीच्या प्रसंगी भक्कम आर्थिक आधार देण्याचे काम कै.लासिंगराव शिंदे पतसंस्थेच्या माध्यमातून गेली 35 वर्ष अव्याहातपणे सुरू आहे. अर्थकारण करत असतानाच विविध सामाजिक उपक्रमही राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. सभासदांचा अतूट विश्वास, संचालक मंडळाचा पारदर्शक कारभार व कामगारांनी दिलेल्या अनमोल योगदानामुळे पतसंस्थेचे प्रगतीच्या दिशेने घोडदौड कायम सुरू आहे असे प्रतिपादन प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी केले.
जावली तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या कुडाळ येथील कै. लालसिंगराव बापूसो शिंदे सहकारी पतसंस्थेचे 35 वी आदी मंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात नुकतेच संपन्न झाली. या सभेत मार्गदर्शन करताना सौरभ शिंदे बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन रमेश फरांदे पाटील होते.
सौरभ शिंदे म्हणाले,प्रतापगड कारखाना उभारणीत लालसिंगराव शिंदे पतसंस्थेचा सिंहाचा वाटा आहे. अनेक अडचणीवर मात करून यावर्षी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून प्रतापगड सहकारी साखर कारखाना सुरू होत आहे.
गेली काही वर्ष कारखाना बंद राहिल्याने जावली तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. परंतु आता अजिंक्य प्रतापगड पर्वाचा प्रारंभ झाला आहे. शेतकऱ्यांनीही आपला पूर्ण ऊस देऊन कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. आपल्या हक्काच्या सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी सभासदांनी अधिक बळ द्यावे.
व्हाईस चेअरमन रमेश फरांदे पाटील यांनी पतसंस्थेच्या सर्वांगीण प्रगतीचा अहवाल सभा सभासदांपुढे मांडला. पारदर्शक व काटकसरीचा कारभार करून संस्थेच्या प्रगतीसाठी संचालक मंडळ सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.