कुडाळ ता.14 – जावळीतील सहकाराचा मानबिंदू असलेला प्रतापगड सहकारी साखर कारखाना सुरळीत चालावा यासाठी संचालक मंडळाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सहकार्याने अजिंक्यतारा कारखान्याच्या माध्यमातून पुन्हा नव्या उमेदीने आगामी गळीत हंगामासाठी प्रतापगड सज्ज झाला आहे. हा कारखाना चांगला चालण्यासाठी कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला ऊस देऊन सहकार्य करावे असे प्रतिपादन प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी केले.
सोनगाव ता. जावली येथील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष सौरभ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी सौरभ शिंदे बोलत होते. प्रारंभी कारखान्याचे संस्थापक माजी आमदार लालसिंगराव शिंदे व संस्थापक चेअरमन राजेंद्र शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सौरभ शिंदे म्हणाले, गेले काही वर्षे प्रतापगड कारखाना बंद असल्याने आपला ऊस कारखान्यांना घालवण्यासाठी शेतकरी मेटाकुटीला आले होते. शेतकऱ्यांची होणारी अडचण पाहून कारखान्याच्या संचालक मंडळाच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देऊन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अजिंक्यतारा कारखान्याच्या माध्यमातून प्रतापगड कारखाना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा कारखाना कायमस्वरूपी चांगला चालावा ही जबाबदारी संचालक मंडळाच्या बरोबरच तालुक्यातील शेतकऱ्यांची आहे. तालुक्यात मुबलक ऊस असताना कारखान्याला बाहेरून ऊस आणावा लागतो हे चित्र बदलावे लागेल. कारखाना कार्यक्षेत्रात अधिकाधिक ऊस लागण व्हावी यासाठी उपाय योजना करण्यात येणार आहेत. शासनाच्या नियमानुसार कारखानाच्या समभागाची किंमत पंधरा हजार रूपये झाली असून सभासदांनी समभागाची उर्वरित रक्कम देऊन सहकार्य करावे. कारखाना सुरळीत चालल्यास शेतकऱ्यांसोबतच कामगारांचेही प्रश्न मार्गी लागणार आहेत.
कारखान्याचे उपाध्यक्ष ऍड. शिवाजीराव मर्ढेकर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, कारखान्याचा गळीत हंगाम लवकरच सुरु होणार आहे. गळीत हंगामासाठी आवश्यक ऊस नोंदणी सुरु असून शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या काही वर्षात कामगारांनी भरपूर योगदान दिले आहे. यापुढेही अशीच साथ द्यावी. येणाऱ्या संकटावर मात करून हा कारखाना सुरु राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. प्रभारी कार्यकारी संचालक राजेंद्र भिलारे यांनी सभेचे नोटीस वाचन केले. ताळेबंद वाचन तुकाराम पवार यांनी केले, सूत्रसंचालन संतोष गायकवाड यांनी केले. संचालक शांताराम पवार यांनी आभार मानले.
यावेळी कुडाळ सोसायटीचे अध्यक्ष मालोजीराव शिंदे, कारखान्याचे संचालक राजेंद्र शिंदे, आनंदाराव मोहिते, रामदास पार्टे, आनंदराव शिंदे, अंकुशराव शिवनकर, राजेंद्र फरांदे,प्रदीप तरडे, आनंदराव जुनघरे, गणपत पार्टे, बाळकृष्ण निकम, बाळासाहेब निकम, विजय शेवते, दिलीप वांगडे, सैा.शोभाताई बारटक्के, ताराबाई पोफळे यांच्यासह सभासद, शेतकरी, कामगार उपस्थित होते.