कुडाळ ता.7 – कर्तव्य सोशल ग्रुप सातारा व सौरभबाबा शिंदे मित्र समुह जावली यांच्या माध्यमातून व पुणे येथील संचेती हॉस्पिटल च्या सहकार्याने आयोजित शिबिरामूळे जावली तालुक्यातील जनतेला चांगली संधी उपलब्ध झाली. ग्रामीण भागातील महिलांना व वयोवृद्ध लोकांना शहरात जाऊन आजाराचे निदान करणे शक्य होत नाही. ती संधी या शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. कर्तव्य सोशल ग्रुपने आजवर सामाजिक बांधिलकी जपत विविध शिबिरांतून जनतेला लाभ दिला आहे. कर्तव्य च्या माध्यमातून होणाऱ्या कार्याचा राजकारणासाठी कुठेही वापर केला जात नाही. त्यामुळे सामाजिक हेतूने कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेले हे शिबीर रुग्णांना वरदान ठरेल असे प्रतिपादन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
कुडाळ ता.जावळी येथे कर्तव्य सोशल ग्रुप सातारा व सौरभबाबा शिंदे मित्र समुह जावली यांच्या वतीने आयोजित अस्थीरोग निदान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी आमदार भोसले बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभबाबा शिंदे, उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, माजी अध्यक्ष राजेंद्र शिंदे, सरपंच सुरेखा कुंभार, कुडाळ सोसायटीचे अध्यक्ष मालोजीराव शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्या शोभाताई बारटक्के, माजी सभापती अरूणाताई शिर्के, डाँ सिध्दार्थ अय्यर आदी मान्यवर उपस्थित होते, पुढे बोलताना भोसले म्हणाले, प्रतापगडचे अध्यक्ष सैारभ शिंदे यांनी माजी आमदार स्वर्गीय लालसिंगराव काका व स्वर्गीय राजेंद्र शिंदे यांचा समाजकारणाचा वारसा जोपासण्याचे काम यानिमित्ताने सुरू ठेवले आहे, अजिंक्यतारा कारखान्याच्या माध्यमातून लवकरच प्रतापगड कारखाना सुरु करत आहोत. यामध्ये विरोधकांनी राजकारण नं करता प्रतापगड कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावे. जावलीचा हक्काचा असणारा प्रतापगड कारखाना चांगला चालला पाहिजेत. प्रतापगड कारखान्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढून तो स्वबळावर चालण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे.
कुडाळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्ती साठी 20 लाखांचा निधी दिला असून अजून चाळीस लाखांचा निधी मिळणार आहे.
प्रतापगडचे अध्यक्ष सौरभ शिंदे बोलताना म्हणाले, सर्वसामान्य जनतेला आर्थिक अडचणी मुळे अनेकदा तज्ज्ञ डॉक्टर्स कडून उपचार घेणे शक्य होत नाही. अशा लोकांना योग्य उपचार या शिबिराच्या माध्यमातून मिळतील.
सामाजिक भान ठेऊन रुग्णांची सेवा करणे एक मोठी जबाबदारी आहे आणि म्हणूनच या निदान शिबिराचे आयोजन करून जनतेची एक प्रकारे खूप मोठी सेवा घडणार आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजें भोसले यांच्या माध्यमातून जावली तालुक्याचा चौफेर विकास झाला आहे. आता येणाऱ्या निवडणुकीत शिवेंद्रराजेंना जावळी तालुक्यातून भरघोस मतदान देण्याची जबाबदारीआपल्या सर्वांची आहे. आगामी निवडणुकीत जावली तालुक्यातून एक लाखाहून अधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयन्त केले पाहिजेत. यावेळी राजेंद्र फरांदे यांची प्रतापगड कारखाना स्वीकृत संचालकपदी निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.या शिबिरासाठी सामाजिक कार्यकर्ते अतुल बावकर यांनी विशेष सहकार्य केल्याचे सौरभ शिंदे यांनी सांगितले.
डॉ. अय्यर म्हणाले, रुग्णांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू. संचेती हॉस्पिटलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शिबीर आयोजित केले जातात. हॉस्पिटल च्या माध्यमातून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असल्याचेही संचेती हॉस्पिटलचे डॉ. अय्यर यांनी सांगितले. यावेळी, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे व ऍड. शिवाजीराव मर्ढेकर यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक संदीप परामणे यांनी केले. यावेळी डाँ सिध्दार्थ अय्यर, डाँ. अर्जून उन्नम, डाँ प्रतिक तिवारी, डाँ.सनद सोनावणे,डाँ. वेलकर, फिजिआोथेरपिस्ट कोमल सिंग, तन्वी ढवळे, दिगंबर माळी, सोमनाथ नवघणे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदींनी डाँक्टरांनी विशेष परिश्रम घेतले.