कुडाळ ता. 3 – जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सोमवारी दि. 4 रोजी मराठा क्रांती मोर्चाने सातारा जिल्हा बंदची हाक दिली आहे. सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून व्यापारी आणि दुकानदारांनी बंदला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलीस दल अलर्ट मोडवर आले आहे.
मराठा आंदोलन लाठीमार विरोधात जावळी तालुक्यातील कुडाळ व मेढा या दोन्ही मुख्य बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून उद्या कुडाळ य़ेथे निषेध कार्यक्रम होणार आहे,मराठा आरक्षण व आपल्या न्याय मागण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या जालना येथिल मराठा बंधू भगिनींवर अमानुष लाठीमार व हल्ला झालेला आहे . या मारहाणीचा निषेध करण्यासाठी व मराठा आरक्षण त्वरित मंजुर करावे या मागणीसाठी कुडाळ, मेढा, कुडाळ पंचक्रोशीतील, जावळी तालुक्यातील सर्व बंधू भगिनीनी उद्या सोमवार दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी ठीक 10: 00 वा. ग्रामपंचायत कार्यालय कुडाळ समोर जमावे असे आवाहनही आयोजकांकडून करण्यात आले आहे.
जालना येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलीस दलाने सतर्क राहावे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत केली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर, सहायक पोलीस अधीक्षक मिना यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.