कुडाळ ता. २५ – संपूर्ण भारतातील एक आगळीवेगळी स्पर्धा म्हणून जावली जोडी रन मॅरेथॉन स्पर्धा आहे. ‘एक धाव आरोग्यासाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन चांगल्या आरोग्यासाठी धावायला या, असे आवाहन करत या स्पर्धेत नागरिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा. ही जावलीकरांची स्वतःची हक्काची स्पर्धा असल्याने जावलीकरांनीही या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘जावली जोडी रन’च्या आयोजकांनी पत्रकार परिषदेत केले.
स्पर्धेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेस संस्थेचे अध्यक्ष नवनाथ डिगे, सदस्य संजय धनावडे, अविनाश कारंजकर उपस्थित होते. या स्पर्धेविषयी आधिक माहिती देताना नवनाथ डिगे म्हणाले, जावलीच्या दुर्गम भागात होणारी ही जोड़ी रन स्पर्धा नावारुपाला येत आहे. विविध ठिकाणच्या एक हजाराहून अधिक स्पर्धकांनी नोंदणीकेली आहे.
जावलीकरांसाठी खास सवलतीच्या दरात अकराशे रुपये एवढे नोंदणी शुल्क ठेवण्यात आले आहे. बाहेरील स्पर्धकांसाठी हीच रक्कम दोन हजार रूपये एवढी आहे. फन रन साठी कोणताही वयोगट नसून पाच किलोमीटरच्या या रनमध्ये चारशे रुपये शुल्क आहे. प्रत्येक स्पर्धकाला टी शर्ट व मेडल देण्यात येणार आहे. पुरूष पुरूष, स्त्री व स्त्री आणि पुरुष व स्त्री अशी जोडी करून सहभाग घेता येणार आहे.
पंधरा ते पंचवीस, पंचवीस ते पस्तीस, पस्तीस ते पन्नास, पन्नास ते पासष्ट असे वयोगट असणार आहेत. प्रत्येक गटानुसार तीस प्रकारची बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून आरोग्याचा संदेश देण्याबरोबरच आपल्या जोडीदाराचे आरोग्य चांगले रहावे अशी संकल्पना घेऊन जोडी रन स्पर्धा होत असून जास्तीत जास्त लोकांनी स्पर्धेसाठी नाव नोंदणी करून सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.