कुडाळ ता. 17 – सातारा जिल्ह्यातील जावली पंचायत समितीला राज्यात सर्व प्रथम ओडीएफ प्लस होण्याचा बहुमान प्राप्त झालेला असून जावली पंचायत समिती या विकास गटातील सर्व ग्रामपंचायती ह्या ओडिएफ प्लस म्हणून शासनाने घोषित केलेल्या आहेत. 15 आँगस्ट स्वातंत्र्य दिनी याबाबत शासनाने जावली तालुक्याच्या नावाची अधिकृत घोषणा केल्यांनतर तालुक्यामध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्वच्छ भारत मिशनअंतर्गत हागणदारीमुक्तीनंतर स्वच्छता, साफसफाई टिकवून ठेवण्यासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या जावळी तालुका पंचायत समितीला १५ ऑगस्ट रोजी ‘ओडीएफ प्लस’ म्हणून घोषित केले आहे,स्वच्छतेच्या ओडीएफ प्लस म्हणून घोषित केलेल्या ग्रामपंचायतींमध्ये जावळी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जावळी तालुका हा आधीच हागणदारीमुक्त झाला. आता ग्रामीण भागात स्वच्छ भारत ग्रामीणअंतर्गत ओडीएफ प्लसची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत स्वच्छता टिकून राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. ओडीएफ प्लसमध्ये वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम व त्यांचा वापर करणे. त्याची शाश्वतता राखणे. गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करणे, शाळा अंगणवाडी व ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व सार्वजनिक संस्थांमध्ये स्वच्छताविषयक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे. गाव नेहमीच स्वच्छ ठेवणे आदीं कामे तालुक्यातील ग्रामपंचायतींनी प्रभावीपणे पूर्तता करून गाव ओडीएफ प्लस केले आहे.
जावळी तालुका ओडीएफ प्लस होण्याकामी जिल्हा परिषद साताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ज्ञानेश्वरजी खिलारी भा.प्र.से.,मा.श्रीमती क्रांती बोराटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा.पु व स्व.वि.) तसेच पंचायत समिती जावलीचे गटविकास अधिकारी श्री मनोज जी भोसले साहेब या सर्वांचे मार्गदर्शन पंचायत समितीला लाभले. तसेच पंचायत विभागाचे सर्व विस्तार अधिकारी स्वच्छ भारत कक्षाकडील तालुका समन्वयक व गट समन्वयक श्री रमेश शिंदे व श्री संतोष जाधव तसेच सर्व ग्रामपंचायत मधील ग्रामसेवकांनी या कामी परिश्रम घेतले.