मेढा , सुनिल धनावडे
दि ३० : जावळीची राजधानी मेढा व संपुर्ण तालुक्यात मागील पाच ते सहा महिन्यांत फोफावलेले अवैध दारू व मटका व्यवसाय १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी बंद करावेत, अन्यथा अवैध दारू साठा पकडून महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना भेट देवून आंदोलन करणार असल्याचा इशारा विलासबाबा जवळ, व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र यांनी जिल्हाधिकारी यांना यासंदर्भात दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, मागील अनेक महिन्यांपासून जावळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू व मटका व्यवसाय सुरू असून या व्यवसायिकांना नेमके पाठबळ कोणाचे? सर्व सामान्य जनतेला दिसत असलेले हे व्यवसाय उत्पादन शुल्क विभाग व पोलिस प्रशासनाला का दिसत नाहीत, असा सामान्य जनतेला प्रश्न पडला आहे. २६ जानेवारीच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला जात असताना मेढा येथे अवैध दारू विक्रेत्याला पकडून आम्ही मेढा पोलिसांच्या स्वाधिन केले. त्यानंतर काही दिवस पोलिस अधिकाऱ्यांकडून कारवायांचा धडाका सुरू होता. पण त्यानंतर या कारवाई थंडावत गेल्या आहेत. जावली तालुक्यातील अनेक गावात हे अवैध व्यवसाय सुरू असून काही गावात तर हातभट्टीची दारू ही सुरू आहे. मेढा, कुडाळ, करहर या बाजारपेठांच्या गावात पोलिस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर हे व्यवसाय सुरू असून त्याकडे दुर्लक्ष का केले जात आहे? उत्पादन शुल्क विभागाने खरंतर या अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करायला हवी.
तसेच त्यांना अवैध विक्रीसाठी देशी-विदेशी दारू पुरवठा करणाऱ्या सातारा येथिल लायसन्स धारककावरदुर्लक्ष का केले जात आहे ? उत्पादन शुल्क विभागाने खरंतर या अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करायला हवी. तसेच त्यांना अवैध विक्रीसाठी देशी-विदेशी दारू पुरवठा करणाऱ्या सातारा येथील लायसन्स धारक दुकानांवर कारवाई करायला हवी. उत्पादन शुल्क विभागाची गाडी महिन्यातून एकदा या अवैध विक्रेत्यांना भेटण्यासाठी येते असे लोकं बोलतात मग कारवाई का होत नाही? मेढा पोलिस स्टेशनला नवीन कारभारी मिळाल्यावर लोकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मा. जिल्हा पोलिस प्रमुखांच्या भूमिकेनुसार सुरवातीला धडाधड कारवाया झाल्या. पण गेल्या चार-पाच महिन्यात तेरी भी चूप आणि मेरी भी चूप असेच काहीसे सुरू असल्याने अगदी मेढ्याच्या व कुडाळच्या भर बाजार चौकात सुध्दा मटका व अवैध दारू व्यवसाय जोमात सुरू आहेत.उत्पादन शुल्क विभाग व पोलिस प्रशासनाकडून या अवैध दारू विक्रेते व मटका व्यावसायिकांवर कारवाई होणार नसेल त्यांना व्यावसायिकांचे अड्डे सापडत नसतील तर आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही व्यसनमुक्त युवक संघटनेच्या माध्यमातून महिला व कार्यकर्त्यांना सोबत घेवून या व्यवसायिकांवर कारवाई करणार आहोत. १५ ऑगस्ट २०२३ पुर्वी हे व्यवसाय बंद झाले नाहीत तर आम्ही स्वतः कार्यकर्त्यासोबत अवैध दारू विक्रेत्यांकडून हा दारूसाठा पकडणार आहोत. जमा झालेला सर्व अवैध दारूचा साठा महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना भेट देणार आहोत. सदर आंदोलनात कोणत्याही कार्यकर्त्यांच्या जिवितास धोका झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासनावर राहील. तरी या निवेदनाचा गांभिर्यपूर्वक विचार करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे .