जावळीराजकीय

प्रतापगड कारखाना पूर्ण क्षमतेने चालवणे हीच भैय्यासाहेबांना खरी आदरांजली – सैारभ शिंदे : कारखाना कार्यस्थळावर 1001 वृक्षारोपणाच्या उपक्रमास सुरूवात – मान्यवरांची उपस्थिती

कुडाळ ता. 17 – माजी आमदार कै. लालसिंगराव शिंदे (काका) व कै.राजेंद्र शिंदे (भैय्यासाहेब)यांनी जावळी सारख्या दुर्गम भागात लोकहितासाठी प्रतापगड सहकारी साखर कारखाना, व इतर सहकारी संस्था निर्माण केल्या. या संस्था चांगल्या चालण्यासाठी स्वतः चा प्राण पणाला लावून प्रामाणिकपणे त्या सांभाळल्या. या संस्था म्हणजे काका व भैय्यासाहेब यांचा आत्मा असून, या संस्था जीवापाड जपत असताना त्या सुस्थितीत व चांगल्या पध्दतीने चालण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिक साथ द्यावी, आत्तापर्यंत कारखान्याला अनेक अडचणी निर्माण झाल्या पण आता अजिंक्यतारा कारखाना प्रतापगडच्या मदतीला धावून आला असून प्रतापगड कारखाना पूर्ण क्षमतेने चालवणे हीच भैय्यासाहेबांना खरी आदरांजली ठरेल, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन प्रतापगड साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी केले.

प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कै. राजेंद्र शिंदे उर्फ भैय्यासाहेब यांच्या १७ व्या पुण्यस्मरण कार्यक्रमात ते बोलत होते, यावेळी माजी अध्यक्षा व मार्गदर्शक सुनेत्रा शिंदे, माजी सभापती मोहनराव शिंदे, अरुणा शिर्के, उपाध्यक्ष अॅड. शिवाजीराव मर्ढेकर, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर भोसले, माजी उपसभापती तानाजी शिर्के, अजिंक्यताराचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते, पुढे बोलताना शिंदे म्हणाले, स्वर्गीय राजेंद्र शिंदे नेहमी म्हणायचे मी असेन अथवा नसेन पण लोकहितासाठी या संस्था वाचायला पाहिजेत, त्यांचे हे शब्द आपल्या हृदयावर कायमचे कोरले गेले आहेत. त्यामुळे या संस्था सुरळीत चालवण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याने सदैव प्रयत्न करणार आहे. प्रतापगड कारखाना उभारणी करताना कारखान्यात एरंड गाळणार का अशी टीका काहीजण करत होते. त्यांना किसनवीर कारखाना बंद पडल्यावर प्रतापगड चे महत्व समजले असेल, अशी टीकाही सौरभ शिंदे यांनी यावेळी केली. आमदार शिवेंद्रसिंहराजें भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्यतारा प्रतापगड कारखाना साखर उद्योग समूह पुन्हा उभारी घेईल असा विश्वासही सौरभ शिंदे यांनी व्यक्त केला.

व्हा. चेअरमन अँड. शिवाजीराव मर्ढेकर म्हणाले, प्रतापगड साखर कारखाना हा तालुक्याचा अनमोल ठेवा आहे. तो जतन करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. या कारखान्याची उभारणी करण्यासाठी खूप मोठी तपस्या करावी लागली आहे. आदरणीय लालसिंगराव काकांना व भैय्या साहेबांना त्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागली. आज आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मदतीने प्रतापगडचं धुरांड पेटणार असून आता यापुढेप्रतापगड भरभराटीला आणण्यासाठी आम्हा संचालक मंडळाला सर्वांनी सहकार्य करावे प्रारंभी कै. लालसिंगराव शिंदे सहकारी पतसंस्थेच्या कारखाना शाखेचे उदघाटन प्रतापगड कारखान्याच्या माजी अध्यक्षा श्रीमती सुनेत्रा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कारखाना कर्मचाऱ्यांना पतसंस्थेच्या माध्यमातून पगार देण्याचा शुभारंभही करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कारखाना परिसरात 1001 वृक्षारोपणाच्या उपक्रमास सुरूवात करण्यात आली. यावेळी रमाकांत शिंदे, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष कमलाकर भोसले, विश्वासराव बोराटे, बबनराव चव्हाण, संदीप परामणे, तानाजीराव शिर्के, अजिंक्य सहकारी कारखाना कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, बुवासाहेब पिसाळ, मोहनराव शिंदे, आदी मान्यवरांनी स्वर्गीय राजेंद्र शिंदे यांच्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर यांनी प्रास्ताविक केले तर संचालक बाळासाहेब निकम यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button