कुडाळ ता. 15 – विश्वसंत नामदेव महाराज की जय..पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी अशा गजरात संत नामदेव महाराज यांची पुण्यतिथी (समाधी संजिवन सोहळा) शनिवार (दि. 15) रोजी कुडाळ, मेढा सह जावली तालुक्यात धार्मिक वातावरणात व मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात आले.
कुडाळ ता.जावळी येथील श्री संत नामदेव शिंपी समाज यांच्या वतीने स्वामी मंगल कार्यालय येथे सकाळपासून अभिषेक, पूजा व विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. सकाळी 9 वाजता युवा किर्तनकार ह.भ.प. आोंकार महाराज नलवडे यांचे सुश्राव्य किर्तन करण्यात आले, त्यानंतर विविध भजनी मंडळांच्या वतीने व वारकर्यांची भजने, संतनामाचा जयघोष, महिला मंडळाची भजने, अशा भक्तिमय वातावरणात हा समाधी संजिवन सोहळा पार पडला. यावेळी श्री संत नामदेव महाराज व श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचेही समाजबांधवांनी व भाविकांनी पुजन करून आरती केली. यावेळी संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेला आकर्षक पुलांची सजावट करण्यात आली होती. किर्तनाची सांगता झाल्यानंतर समाजबांधवांनी दहीहंडी फोडून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी परिसरातील शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमासाठी येथील सर्व शिंपी समाजबांधव तसेच वारकरी सांप्रदयातील भाविक मेठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कीर्तनांतून समाजप्रबोधन
युवा किर्तनकार ह.भ.प. आोंकार महाराज नलवडे यांचे सकाळी कीर्तन झाले. संत नामदेव महाराज यांच्या जीवनचरित्राविषयी त्यांनी कीर्तनातून माहिती दिली व समाजाचा सर्वांगीण विकासकरण्यासाठी समाजबांधवांनी संघटित व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. परिसरातील भाविक-श्रोत्यांची कीर्तनाला मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.