कुडाळ ता. 4 – शेतकऱ्यांचा सखा असलेल्या बैलांप्रती आदरभाव व्यक्त करणारा बेंदूर हा सण कुडाळ आणि परिसरात पारंपरिक आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी अनेक हैाशी शेतकरी बंधूंनी आपल्या बैलांच्या मिरवणुकीसाठी ढोल ताशांसह डीजे आणला होता, गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत यावेळी मिरवणुकीत शेकडो तरूण डीजेच्या तालावर ऩाचत होते, लाडक्या बैलांच्या हौशेसाठी यावेळी मोठ्या प्रमाणात खर्च करून दणक्यात बेंदूर सण साजरा करण्यात आला.
जावळी तालुका हा डोंगरी दुर्गम व शेतीपुरक विभाग असल्याने आधुनिकतेच्या काळातही येथे अनेक शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात शेतीच्या कामांसाठी बैलजोडीचा वापर पहावयास मिळतो, प्रतिवर्षांप्रमाणे याहीवर्षी कुडाळ व परिसरात बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून शेतकरी वर्गाकडून गाय-बैलांना न्हाऊ माखू घातले जात होते. त्यानंतर शिंगांना व अंगावर रंगरंगोटी, अंगावर झूल घालून पुरणपोळीचा नैवेद्य खायला दिला गेला. याशिवाय घरात मातीचे दोन बैल आणून त्यांची हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगांवर ठेवून त्यांची मनोभावे पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला.
बैलांना सजवण्यासाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी बाजारपेठेत मांडण्यात आलेल्या स्टॉलवर बळीराजाने गर्दी केली होती. सकाळपासून कुडाळ येथील निरंजना नदीघाटावर आपल्या बैलांना अंघोळ घालून त्यांना विविध आकर्षक रंगांनी व फुलांनी सजवून त्यांची संपुर्ण गावातून पिंपळेश्वर मंदिरापर्यंत वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येत होती. यावेळी मिरवणुकीत आो शेठ तुम्ही नादच केला थेट…पाटलांचा बैलगाडा, नाद एकच एकच एकच फक्त बैलगाडा शर्यंत अशा अनेक गाण्यांवर शेकडो तरूण डीजेच्या तालावर थिरकले. मिरवणुकीदरम्यान अनेक ठिकाणी बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात येत होता, बेंदूर सणानिमित्त बैलांचे पूजन शेतकरी कुटुंबीयांनी केले. मिरवणुकीने घरी आल्यावर बैलांची ओवाळणी करून बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य चारण्यात आला.