कुडाळ ता.८ – जावली तालुका हा डोंगराळ आणि दुर्गम प्रदेश म्हणून ओळखला जातो. या भागाचा सर्वांगीण विकास साधताना येथील शेतकरी आर्थिक सक्षम झाला पाहिजे, याच उद्देशाने अजिंक्यतारा कारखान्याने प्रतापगड कारखाना भागीदारी तत्वावर चालविण्यास घेतला आहे. प्रतापगड कारखाना सुरु करून आगामी गळीत हंगामात ४ लाख मे. टन उसाचे गाळप केले जाईल आणि हंगाम यशस्वीपणे संपन्न होईल. प्रतापगड कारखान्यामुळे जावली तालुक्यात खऱ्या अर्थाने सहकारक्रांती घडेल, असा विश्वास अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
प्रतापगड कारखान्याला उर्जितावस्था प्राप्त व्हावी, या कारखान्याच्या सभासद, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावून त्यांची आर्थिक उन्नती व्हावी या हेतूने आणि सामाजिक बांधिलकी म्हणून अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने प्रतापगड कारखाना १५ वर्षांच्या कालावधीसाठी भागीदारी तत्वावर चालविण्यास घेतला आहे. आगामी २०२३- २४ च्या गळीत हंगामात प्रतापगड कारखाना ४ लाख मे. टन ऊस गाळप करणार असून कारखाना सुरु करण्यापूर्वी कारखान्यातील मशिनरी दुरुस्ती आणि देखभालीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, व्हा. चेअरमन शिवाजीराव मर्ढेकर, अजिंक्यतारा कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हा. चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, प्रतापगडचे कार्यकारी संचालक राजेंद्र भिलारे यांच्यासह दोन्ही कारखान्याचे सर्व संचालक, प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सौरभ शिंदे व उपस्थित सर्व संचालक यांच्या समवेत कारखान्याची पाहणी केली. २०२३- २४ च्या हंगामात कारखाना कार्यक्षेत्रामधून उसाची उपलब्धता विचारात घेता ४ लाख मे. टन उसाचे गाळप करून हंगाम यशस्वीपणे संपन्न करण्याचा मनोदय दोन्ही व्यवस्थापनाचा आहे. कारखाना पूर्ण क्षमतेने चालावा यासाठी कारखान्यातील मशिनरी दुरुस्ती आणि देखभालीचे काम हाती घेण्यात आले आहे. अजिंक्यतारा कारखान्याच्या सहकार्याने प्रतापगड कारखान्याला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त होईल आणि या संस्थेच्या माध्यमातून जावली तालुक्यातील शेतकऱ्यांना उभारी मिळेल, असे आ.शिवेंद्रसिंहराजे याप्रसंगी म्हणाले.