कुडाळ ता. 4 – राष्ट्रवादीचे आमदार व माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचे बंधू आणि माथाकामगार नेते ऋषिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदेगट) प्रवेश केला आहे. शिंदे यांच्या पक्षप्रवेशामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी काल हा पक्ष प्रवेश पार पडला. याप्रसंगी वाशी नवी मुंबई शिवसेना संपर्कप्रमुख किशोर पाटकर, तसेच घणसोली विभागातीलऋषिकांत शिंदे यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्त्यांनीशिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. आगामी काळात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) निवडणूक एकत्र लढणार आहेत. त्यासाठी हेबेरजेचे राजकारण जिल्ह्यात सुरू असल्याचे बोलले जात आहे. ऋषिकांत शिंदे यांच्या मागे माथाडीची मोठी ताकद आहे. त्यामुळे शिवसेनेला (शिंदे गट) याचा मुंबई आणि सातारा जिल्ह्यात फायदा होणार आहे.ऋषिकांत शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने सातारा जिल्ह्यासह जावली तालुक्यात राजकीयचर्चांना उधाण आलं आहे.
काल सायंकाळी आमदार शशिकांत शिंदे यांनी एकनाथ शिंदेंसह शिवसेनेतील आमदारांवर टीकेची तोफ डागली असतानाच खुद्द त्यांच्या भावानेच शिवसेनेत प्रवेशकेल्यामुळं जिल्हाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. ऋषिकांत शिंदे यांच्या याप्रवेशामुळे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना हा मोठा धक्का बसला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला काही महिने राहिले असतानाच या पक्षप्रवेशामुळे आता सातारा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर आमदार शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे पडद्यामागचे अदृश्य शक्ती म्हणून उभे राहिलेले ऋषिकांत शिंदे यांची सातारा जिल्ह्यातील व नवी मुंबई राष्ट्रवादी पक्षात ओळख आहे. जावळी तालुक्यात शशिकांत शिंदेंना १० वर्षांपासून आमदार करण्यात ऋषिकांत शिंदे यांचा मोलाचा वाटा आहे. ऋषिकांत शिंदे यांनी अचानक राष्ट्रवादी पक्षाला रामराम करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भगवा झेंडा खांद्यावर घेत जय महाराष्ट्रचा नारा दिला. या सर्व घडामोडीमुळे आमदार शशिकांत शिंदे व राष्ट्रवादीला जोरदार धक्का मानला जात आहे. आगामी काळातील राष्ट्रवादी पक्षासह व भविष्यातील सगळ्या निवडणुकीची समीकरणे बदल्याची शक्यता आहे.
खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सातारा जिल्हा हा पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. साताऱ्याने राष्ट्रवादीला अनेक मोठे नेते आणि मंत्री दिले आहेत. परंतु गेल्या काही वर्षांपासून भाजप आणि शिवसेनेची ताकद साताऱ्यात वाढली आहे. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांना पक्षात घेऊन भाजप शिवसेनेने साताऱ्यात आपली पकड मजबुत केली आहे. त्यातच आता तर थेट आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकेश शिंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने चर्चाना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचे ऋषीभाई शिंदे मोठे बंधू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ऋषीभाई शिंदे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश म्हणजे राजकीय भूकंप मानला जात आहे. ऋषीभाई शिदे यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने मुख्यमंत्री शिंदे यांनी माथाडी कामगारांमध्ये आपली ताकद वाढवली असून, त्याचा राजकीय फायदा नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण मानला जात आहे. माथाडी नेते ऋषीभाई शिंदे यांनी केलेल्या राजकीय भूकंपानंतर जावळी तालुक्यात देखील प्रतिक्रिया उमटल्या असून जावळीत माथाडी नेते ऋषीभाई शिंदे यांचा शिवसेनेतील प्रवेशाचा फायदा कोणाला होणार ते काळच ठरवेल हे मात्र निश्चित.
पक्षांतर्गतच कुरघोड्यांमुळे नाराजीतून पक्षप्रवेश – ऋषिकांत शिंदे
राष्ट्रवादी पक्षात असणारे अंतर्गत मतभेद, समन्वयाचा अभाव व गतवेळच्या जिल्हा परिषद निवडणुकीत कुडाळ गटात माझा पक्षांतर्गतच कुरघोड्यांमुळे जाणीवपूर्वक केलेला पराभव. या पार्श्वभूमीवर मी शिवसेनेत प्रवेश केला आहे, असा खुलासा राष्ट्रवादीचे नेते, माथाडी कामगारांचे ज्येष्ठ नेते ऋषिकांत शिंदे यांनी बोलताना केला.म्हणाले मी जिल्हा परिषद कुडाळ गटामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर उभे होतो. मात्र, पक्षांतर्गत गद्दारीमुळे व कुरघोड्याचे राजकारणामुळे पराभव केला.जिल्हा परिषद कुडाळ गटात राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर माझा पराभव झाल्यानंतर तेव्हापासून आजपर्यंत माझ्या कार्यकर्त्यांना न्याय दिला गेला नाही. जनतेला न्याय दिला गेला नाही. नवी मुंबईमध्ये अनेक कामे प्रलंबित आहेत. त्या कामांना न्याय देण्यासाठी माथाडी कामगारांना खऱ्या अर्थाने त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी पाहिलेल्या प्रत्येक स्वप्नपूर्तीसाठी मी शिवसेनेत प्रवेश केल्याचे ऋषिकांत शिंदे यांनी सांगितले. जावळी तालुक्यात याचे पडसाद उमटले आहेत. ऋषिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना नवा पक्ष नवी दिशा मिळाल्यामुळे जावळी तालुक्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. एकीकडे शशिकांत शिंदे यांचा शिंदे गटाच्या आमदार महेश शिंदे यांच्याशी कोरेगाव तालुक्यात संघर्ष सुरू आहे. आता त्याच गटात ज्येष्ठ बंधू ऋषिकांत शिंदे यांचा प्रवेश झाल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
ऋषींकात शिंदेंच्या शिवसेना प्रवेशामुळे मला फरक पडणार नाही – शशिकांत शिंदे
विरोधकांना शशिकांत शिंदेची भिती वाटते, म्हणूनच माझे घर फोडण्याचा प्रयन्त झाला, कोणी कुठेही जाऊद्या, मला फरक पडत नाही, मरेपर्यंत मी शरद पवारांची साथ सोडणार नाही, महाविकास आघाडीची लोकप्रियता वाढत असल्यानेच असे कुटील राजकारण सूरू आहे, मलाही अनेकवेळा घेरण्याचा प्रयत्न झाला, मात्र मी कधीही हार मानली नाही, जोपर्यंत शरद पवार साहेबांचा आशिर्वाद माझ्या सोबत आहे, तोपर्यंत मी कुठल्याही राजकारणाला बळी पडणार नाही.