कुडाळ ता. 3 – जावली तालुक्यातील अग्रगण्य पतसंस्था असलेल्या कुडाळ येथील कै. लालसिंगराव बापूसो शिंदे सहकारी पतसंस्थेचा सन 2023-24 ते 2028-29 या पाच वर्षासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. या निवडणुकीत संचालक मंडळाच्या तेरा जागांसाठी तेराच अर्ज दाखल झाले होते. अर्ज माघार घेण्याचा गुरुवार ता. 1 अखेरचा दिवस होता. त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जावली रूपनवरकर यांनी जाहीर केले. बिनविरोध निवड झालेले संचालक पुढील प्रमाणे सर्वसाधारण मतदारसंघ सौरभ राजेंद्र शिंदे (कुडाळ), रमेश दत्तात्रय फरांदे (आनेवाडी) रघुनाथ जगन्नाथ तरडे (बामणोली), कांताराम आण्णा ससाणे (आर्डे ), नितीन बबन दुदुस्कर (मोरेवाडी ), रवींद्र प्रल्हाद निकम (करंदी तर्फ कुडाळ ), विकास ज्ञानेश्वर जाधव (कुडाळ ), महिला राखीव मतदार संघातून सौ. अंकिता सौरभ शिंदे व सौ.लीलावती दिलीप पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. जितेंद्र साहेबराव खरात (मोरावळे) अनुसूचित जाती जमाती, राहुल विठ्ठल बावकर (कुडाळ ) विमुक्त जाती जमाती, अशोक तात्याबा रासकर (कुडाळ) इतर मागास प्रवर्ग यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी संस्थेच्या मुख्य कार्यालयात नवीन संचालक मंडळाचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जावली बाजार समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र शिंदे, प्रतापगड कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अंकुशराव शिवणकर, दादासाहेब फरांदे, वसंतराव तरडे, विठ्ठल मोरे, धैर्यशील शिंदे, बाबासाहेब शिंदे, यांच्यासह ग्रामस्थ, सभासद व कर्मचारी उपस्थित होते.
पतसंस्थेच्या प्रगतीची घोडदौड यापुढेही अधिक वेगाने होणार – सौरभ शिंदे
माजी आमदार कै. लालसिंगराव शिंदे यांनी पतसंस्थेची स्थापना केली. त्यानंतर दिवंगत अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेची प्रगती होत गेली. ही निवडणूक बिनविरोध करून सभासदांनी दाखवलेला विश्वास नवीन संचालक मंडळ सार्थ ठरवेल.यापुढेही पतसंस्थेच्या प्रगतीची घोडदौड अधिक वेगाने सुरु राहील असे प्रतिपादन प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी यावेळी बोलताना केले. पतसंस्थेची आर्थिक उलाढाल अधिक वेगाने व्हावी यासाठी प्रतापगड कारखाना स्थळावर संस्थेची शाखा काढण्यात येणार आहे. या शाखेच्या माध्यमातून कामगारांचे पगार केले जातील. संस्थेच्या मेढा , करहर, सायगाव यथील शाखांना सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. लोकांच्या आर्थिक गरजा भागवण्या बरोबरच संस्था सामाजिक वंधिलकी जपत आहे.