कुडाळ ता.3 – जावळी तालुक्यातील मोठी लोकसंख्या असलेल्या कुडाळ गावाला उन्हाळ्यात काही अंशी पाण्याची समस्या भेडसावत असते. नदीपात्रामध्ये पाण्याचा स्त्रोत कमी झाल्यास गावच्या पाणीपुरवठा विहिरीवर याचा परिणाम होतो. पाणीपुरवठ्याची ही समस्या विचारात घेऊन कुडाळ ग्रामपंचायतीने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे पाठपुरावा केला होता, त्यानुसार आमदार शिवेंद्रराजेंच्या प्रयत्नामुळे कुडाळी नदीवर जलसंधारण विभाग यांच्या निधीतून एक कोटी रुपये खर्चाचा पाणीसाठवण बंधारा मंजूर झाला असून प्रत्यक्षात कामास सुरवात करण्यात आली आहे. यामुळे कुडाळवासीयांचा प्राणी प्रश्न आता कायमचा मार्गी लागणार असल्याची माहीती सरपंच सैा. सुरेखा कुंभार यांनी दिली आहे.
जावली तालुक्यातील सर्वात मोठे लोक वस्तीचे गाव असलेल्या कुडाळ गावाला नदीकाठी असणाऱ्या विहीरीतून पाणीपुरवठ्याची सोय होत आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये नदीचे पाणी कमी झाले की गावचा पाणीपुरवठाही अनिमित होत असतो.ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावते.यासाठी कायमची उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून नदीवर साठवण बंधारा होण्यासाठी प्रयत्न केले.त्यांच्या या प्रयत्नाला यश आले असून पाणीपुरवठा विहिरीच्या जवळ नदीवर बंधारा बांधण्यास सुरुवात झाली आहे.अंदाजे एक कोटी रुपयांच्या निधी खर्च करून या पाणी साठवणुकीचा बंधारा तयार होत आहे.यामुळे आगामी काळात कुडाळकरांचा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.
याकरिता सर्वच लोकप्रतिनिधींचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे. हा बंधारा पूर्णत्व झाल्यानंतर निश्चितच गावच्या पिण्याचा पाणी प्रश्न सुटला जाणार आहे.यामुळे उन्हाळ्यात गावाला भेडसावणारी पाणीसमस्या दूर होण्यास मदत होणार आहे.या कामाबाबद्दल कुडाळचे ग्रामस्थ,महिला भगिनी आदींनी लोकप्रतिनिधी,ग्रामपंचायत सदस्य ,पदाधिकारी आदींचे आभार व्यक्त केले आहेत. नुकतीच या कामाची पाहणी पंचायत समितीचे माजी उपसभापती सैारभबाबा शिंदे, सरपंच सैा.सरेखा कुंभार, कुडाळ सोसायटीचे अध्यक्ष मालोजीराव शिंदे, ग्रामपंचायत सदस्य धैर्य़शिल शिंदे, जगन्नाथ कचरे, संगिता लोखंडे, विजय शेवते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फुकटचा श्रेयवाद नको – सैा.कुंभार, सरपंच कुडाळ
सरपंच सैा.कुंभार यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार, मा.आमदार श्रीमंत छ.शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातुन जावळी तालुक्यात ४ बंधारे मंजुर झाले आहेत, बामणोली, सर्जापुर, आखाडे आणि कुडाळ अशा गावांना हे बंधारे होणार आहेत,
कुडाळचा बंधारा सह्याद्री कंस्ट्रक्शन म्हणजे विजय शेलार हे काम करत आहेत. हे काम फक्त शिवेंद्रराजेंच्या पाठपुराव्यानेच झालेले आहे. ह्याचे श्रेय लाटायचा केविलवाणा प्रकार जो चालवलेला आहे ते त्वरीत थांबवावा.. असेही पत्रकात नमूद करण्यात आलेले आहे. कसलीही मागणी नाही.. पाठपुरावा नाही.. माहिती सुद्धा कामाची नाही आणि आम्ही काम केले असल्या पोकळ वल्गना करणे बंद करा.. बंधाऱ्याचे काम हे आमदार मा.शिवेंद्रराजे भोसले यांच्याच माध्यमातून सुरू आहे. जावळी तालुक्यात चार ठिकाणी शिवेंद्रराजेंच्या शिफारसीवर मंजुर झालेल्या बंधार्यांचे श्रेय लाटण्याचे काम त्वरीत थांबवावे. याकामाबाबत अधिकृत ठेकेदाराकडे शहानिशा करा म्हणजे कळेल कोणी काम मंजुर केले आहे. लवकरच आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते या कामाचे भूमीपुजन झाल्यानंतर खरे काय ते जनतेसमोर येणारच आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे कुडाळ गावाच्या वतीने सरपंच सुरेखा कुंभार व सदस्यांनी व ग्रामसथांनी आभारही मानले.