कुडाळ ता. 20 – जावली तालुक्यातील रिक्त असलेल्या ग्रामपंचायतीच्या जागांसाठी नुकतीच निवडणूक प्रकिया पार पडली. यामध्ये कुडाळ ग्रामपंचायतीच्या शिवाजी वार्डमधील एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीने तालुक्याचे लक्ष वेधले होते. यात अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष व माजी उपसभापती सौरभ शिंदे यांच्या रयत पॅनल विरुद्ध हेमंत शिंदे यांच्या बहुजन विकास आघाडी व माजी सरपंच वीरेंद्र शिंदे यांच्या समर्थ पॅनल यांनी एकत्रित लढा दिला होता. यामध्ये सैारभ शिंदे यांच्या विचाराच्या रयत पॅनलच्या उमेदवार संगीता अशोक लोखंडे यांनी 87 मतांनी मोठा विजय संपादन केल्याने पुन्हा एकदा या ठिकाणी रयत पॅनलचेच वर्चस्व सिद्ध झाले आहे.
सन 2020 सली झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत कुडाळ ग्रामपंचायती मध्ये कोणत्याही गटाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. यातच गावच्या विकासात्मक बाबींचा विचार करून दोन गट एकत्रित येत आपली सत्ता ग्रामपंचायतमध्ये स्थापन केली होती, मात्र काही राजकीय घडामोडीत शिवाजी वार्डच्या सदस्यांनी राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक लागली होती. रयत पॅनलकडे सात सदस्य तर बहुजन विकास आघाडीकडे चार आणि समर्थ पॅनलकडे चार जागा होत्या. यामुळे या पोटनिवडणुकीकडे विशेष लक्ष होते. ही जागा जिंकण्यासाठी रयत पॅनल विरुद्ध विरोधी समर्थ व बहुजन पॅनलने एकत्रित येऊन कमालीचे प्रयत्न केले. मात्र यात त्यांना यश मिळाले नाही. रयत पॅनलच्या उमेदवार संगीता अशोक लोखंडे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सौ. सविता शेवते यांचा पराभव केल्याने सौरभ शिंदे यांच्या गटाच्या रयत पॅनलच्या उमेदवाराने पुन्हा एकदा बाजी मारत आपला गड शाबूत ठेवला आहे. यामुळे सरपंचपद रयत पॅनलकडेच कायम राहिले असून ग्रामपंचायतीबाबतच्या तर्कवितर्कला पूर्णविराम मिळाला आहे.
या निकालावर ग्रामपंचायतीचे भविष्यातील राजकीय गणिते अवलंबून होती. कारण गतवेळी तीन गट एकमेकांविरोधात लढले होते, यावेळी दोन गट एकत्र आल्याने दोघांची ताकद वाढल्याने सत्तेचे गणित बदलणार अशा अटकळई बांधल्या जात होत्या, मात्र सुज्ञ मतदारांनी विरोधी दोन्ही गटांना सपशेल नाकारले व रयत पॅनेलच्याच उमेदवाराला विजयी केले. या निकालावरून मतदारांचा व ग्रामस्थांचा भविष्यातील एकदंरित कल यानिमित्ताने स्पष्ट झाला. सैारभ शिंदे विरूद्ध गावातील सर्व गट तट एकत्र येत रणनीती आखली होती. मात्र सौरभ शिंदे यांनी एकाकी असूनही गावातील सर्व विरोधी गटांना चितपट करत बाजी मारली, विजयानंतर विजयी उमेदवार व कार्यकत्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत विजयी मिरवणुक काढत एकच जल्लोष केला. यावेळी मिरवणुकीत सैारभ शिंदे, बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र शिंदे, मालोजीराव शिंदे, माजी सरपंच शिवाजीराव शेवते, सरपंच सैा. सुरेखा कुंभार, विजय कुंभार, अमोल शिंदे, महादेवराव शिंदे, समिर आतार,धैर्यशिल शिंदे, दत्ता कांबळे, यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यानंतर बोलताना सैारभ शिंदे म्हणाले, ही निवडणुक कुडाळच्या भविष्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी पोटनिवडणुक होती, यामध्ये उमेदवाराला नाही तर व्यक्तीगत पातळीवर विरोध दाखवण्यासाठी सर्व गट तट एकत्र आले होते, मात्र मतदारांनी त्यांना चांगलीच चपराख निकालातून दिली असून कै. लालासिंगराव शिंदे व कै. राजेंद्र शिंदे यांच्या विचारांचा हा विजय असल्याचे पुऩ्हा एकदा अधोरेखित झाले आहे, मतदारांनी दाखवलेला विश्वास गावचा सर्वांगिण विकास करून सार्थ ठरवून दाखवणार असून, कुडाळची जनता कोणाच्या पाठीशी आहे हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जनतेच्या विश्वालासा तडा जाऊ देणार नाही.