कुडाळ ता. 29 – जावळी महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला असून महाविकास आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला तर शेतकरी विकास पॅनलने सर्वच्या सर्व 12 जागांवर विजय मिळवत बाजार समितीवर आपली एकहाथी सत्ता आणली. या निवडणुकीत महाविकास आघाडी पॅनलचा पुर्णता सुपडासाफ करत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार मकरंद पाटील यांनी एकत्रित येऊन लढवलेल्या शेतकरी विकास पॅनलने बाजार समितीवरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. हा विजय आगामी राजकीय गणिते मजबूत करणारी असल्यामुळे जेष्ठ नेते वसंतराव मानकुमरे यांनी तीन आमदारांना एकत्र आणण्याचा केलेला प्रयत्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी फायद्याचा ठरला.निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळम व फटाक्यांची आतीषबाजी करत विजयाचा एकच जल्लोष केला.विजया नंतर विजयी उमेदवारांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले,आमदार शिंदे व आमदार मकरंद पाटील यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
जावळी महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकुण 18 संचालकांच्या जागेसाठी ही निवडणुक लागली होती, त्यापैकी शेतकरी विकास पॅनलच्या 6 जागा निवडणुकीपुर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या, त्यामुळे उर्वरित 12 जागांसाठीच ही निवडणुक झाली, आज ता. 29 रोजी झालेल्या निकालामध्ये सर्वच्या सर्व 12 जागांवर शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला, त्यामुळे शेतकरी विकास पँनेलने बिनविरोध निवडून आलेल्या 6 व विजयी झालेल्या 12 अशा एकुण 18 जागांवर विजय मिळवत बाजार समितीवर एकहाथी सत्ता स्थापन केली. निवडणुक जाहीर झाल्यापासून या निवडणुकीकडे संपुर्ण जिल्हयाचे लक्ष लागले होते, या निवडणुकीच्या निमित्ताने साताऱा जिल्हायात प्रथमच वेगळं राजकीय समीकरण पहायला मिळाल होते. याठिकाणी भाजप, राष्ट्रवादी युतीतुन तीन आमदार एकत्र आले होते
तर दुसरीकडे महाविकास आघाडी गट, ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट हे तिन्ही पक्ष आमदार गटाला टक्कर देत विरोधात निवडणूक लढत होते भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील हे तिघे एकत्र निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र आले होते. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे दीपक पवार, ठाकरे सेनेचे सदाशिव सपकाळ, शिवसेना शिंदे गटाचे संदीप पवार त्यांच्या विरोधात एकत्र येऊन निवडणूक लढवत होते, अखेर दीपक पवार आणि ठाकरे गटाचे शिवसेनेचे नेते सदाशिव सपकाळ यांच्या गटाला मोठी हार पत्करावी लागली आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे व आमदार मकरंद पाटील या तीन्ही आमदारांनी आपापासातले पक्षीय पातळीवरील गट तट व मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचा निर्णय घेऊन ही निवडणुक बिनविरोध करण्याचे ठरविले होते त्यानुसार आमदार शिवेंद्रराजे गटाला 8 जागा, आमदार शिंदे गटाला 5 जागा व आमदार पाटील गटाला 5 जागा अशा जागावाटपाचा फाँम्युर्ला ठरवण्यात आला होता, मात्र यामध्ये माजी आमदार सदाशिव सपकाळ व माजी जिल्हा परिषद सदस्य दिपक पवार तसेच शिवसेना (शिंदे गट) यांना विचारात न घेतल्याने ही निवडणुक लागली असल्याचे विरोधकांकडून सांगण्यात आले व सदरच्या निवडणुकीला सर्वच गटांना सामोरे जावे लागले होते,
त्यामुळे तीन आजी आमदार विरूध्द एक माजी आमदार अशी ही निवडणुक अखेर झाली, मात्र तालुक्यातील बहुंताशी ग्रामपंचायती व सोसायट्यांची सत्ता ही आमदार भोसले गटाकडे असल्याने आजच्या निवडणुकीचा निकाल शेतकरी विकास पँनेलच्या बाजूने लागणार हे अपेक्षितच होते. मात्र तरीही विरोध गटाला मिळालेली मतेही सत्ताधाऱ्यांना विचार करायला लावणारी आहेत हे नाकारता येणार नाही, विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे राजेंद्र सखाराम भिलारे 460, मच्छिंद्र लक्ष्मण मुळीक 533, प्रमोद बाजीराव शेलार 537, हनुमंत सहदेव शिंगटे 543, जयदीप शिवाजी शिंदे 531, प्रमोद शंकर शिंदे 535, हेमंत हिंदुराव शिंदे 530, पांडुरंग नमाजी कारंडे 865, गुलाब विठ्ठल गोळे 832, बुवासाहेब एकनाथराव पिसाळ 821, दत्तात्रय कदम 223, प्रकाश जेधे 227 निकालानंतर सर्व विजयी उमेदवारांनी विजयी मिरवणुक काढत विजयोचा जल्लेोष साजरा केला.