कुडाळ ता. 28 – तालुकास्तरावरील शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहचला पाहिजे. यासाठी शासकीय योजनांची जत्रा हा उपक्रम नियोजनबद्ध पध्दतीने राबवून तालुक्यातील हजारो लाभार्थींचे उद्दिष्ट पूर्ण करूया, असे आवाहन परिविक्षाधीन तहसिलदार मयुर राऊत यांनी या उपक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
करहर ता. जावली येथे शासकीय योजनांची जत्रा हा उपक्रम राबविण्यात आला त्यावेळी ते बोलत होते, यावेळी पुढे ते म्हणाले, जावली तालुका हा अत्यंत डोंगरी व दर्गम विभाग असून भौगोलिक रचना विखुरलेली आहे, त्यामुळे शासकीय कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी येताना अनेक अडचणी येतात मात्र शासनाने ‘शासकीय योजनांची जत्रा’ हा उपक्रम हाथी घेतला आहे,त्याचा फायदा येथील नागरिकांना होणार आहे.
यावेळी निवासी नायब तहसिलदार संजय बैलकर, मुख्यमंत्री कार्यालय जनकल्याण कक्ष अधिकारी सागर शिंदे, मंडल अधिकारी व्ही. एस. पाटणकर, तलाठी सागर माळेकर, सुदर्शन कांबळे, श्रीकांत चव्हाण, श्री. धनावडे आदी अधिकारी उपस्थित होते. निवासी नायब तहसिलदार संजय बैलकर बोलताना म्हणाले, राज्य शासनाच्यावतीने शासकीय योजनांची तातडीने अंमलबजावणी आणि लाभार्थींना त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासकीय योजनांची जत्रा हा उपक्रम राबवला जात आहे. ‘जत्रा शासकीय योजनांची’ या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक योजना लाभार्थीपर्यंत पोचवण्यासाठी प्रत्येक विभागाने लाभार्थींची यादी तयार करून, तात्काळ प्रस्ताव तयार करत हा उपक्रम यशस्वी करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. सर्वसामान्यांच्या विकासासाठी हा उपक्रम आहे.याचा फायदा म्हणजे शासकीय वेगवेगळ्या खात्यांच्या योजना एकाच वेळी लाभार्थींपर्यत पोचवल्या जाणार आहेत. कल्याणकारी राज्य व्यवस्थेच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आर्थिक आणि सामाजिक कल्याण व सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने ही योजना आणली आहे. प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोचून त्याच्यासाठी असलेल्या योजनेचा लाभ देणार आहे. करहर येथील या उपक्रमावेळी ग्रामपंचायत विभागाचे 52 तर तलाठी यांच्याकडील 644 दाखले व उतारे तसेच सेतू विभागाचे 51 दाखले, 60 आधारकार्ड तर पुरवठा विभागाचे 112 असे एकुण 919 दाखल्यांचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले. यावेळी विविध गावातील सरपंच, ग्रामपंचायत सद्स्य, ग्रामसेवक, तलाठी व लाभार्थी उपस्थित होते.