कुडाळ ता.14 – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कुडाळसह संपुर्ण जावली तालुक्यात मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी कुडाळ ता.जावली य़ेथील पंचशिलनगर येथे विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते. संध्याकाळी शिस्तबद्ध वातावरणात संपुर्ण कुडाळ गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
जावली तलुक्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या कुडाळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. यानिमित्ताने अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पंचशिल नगर येथे महामानवाच्या प्रतिमिचे पुजन, व्याख्यान, प्रबोधनात्मक कार्यक्रम, विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी जयंतीचा कार्यक्रमानिमित राजकीय पक्षांतर्फे व ग्रामस्थांच्या वतीने महामानवाला अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते, यावेळी अनेक उपस्थि मान्यवरांनी आपल्या भाषणात भारतीय संविधानाची आणि संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती दिली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, करुणा आणि सहिष्णुता या मूल्यांच्या आधारे घटनेचे मर्म विशद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना दशरथ कांबळे यांनी भारतीय समाजात खोलवर रुजलेली जातीयता समूळ नष्ट करण्याची गरज स्पष्ट केली.
त्यानंतर संध्याकाळी कुडाळ बाजारपेठेतून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य मिरवणूकही काढण्यात आली. डीजेच्या निनादात व फटाक्यांच्या आतिषबाजीत बाबासाहेबांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ही मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनीही बंदोबस्त ठेवला होता, यावेळी ठिकठिकाणी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले व अभिवादन करण्यातआले. यावेळी युवक, युवती, महिला मोठ्या संख्यने मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.