कुडाळ ता.14 सातारा जावळीचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावळी तालुक्यातील सर्वात मोठ्या जत्रोत्सवाला कुडाळ ता.जावळी येथे उपस्थित राहून श्री. पिंपळेश्वर-वाकडेश्वर यात्रेनिमित्त मंदिरात जाऊन दर्शन घेतले. आमदाऱ शिवेंद्रसिंहराजे यांच्यासमवेत प्रतापगड काऱखान्याचे चेअरमन सैारभबाबा शिंदे, कुडाळ सोसायटीचे चेअरमन मालोजीराव शिंदे, माजी सरपंच विरेंद्र शिंदे, धैर्यशिल शिंदे, अमृतराव शिंदे, अमोल शिंदे, यात्रा समितीचे अध्यक्ष सुनिल रासकर यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्थ हेही उपस्थित होते.
दरम्यान, कोरोना नंतर गेल्या दोन वर्षांनतर जत्रा, यात्रा उत्सव साजरे होत असून गावातील सर्व ग्रामस्थांनी एकोप्याने हे उत्सव शांततेत साजरे करावेत, यात्रा काळात येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक ती सोयी सुविधा उपलब्ध करून यात्रा सुरूळीत व आनंदात साजरी करावी, श्री पिंपळेश्वर वाकडेश्वराचे आशिर्वाद सदैव माझ्या व जावलीतील जनतेच्या पाठीशी रहावेत, असा आशिर्वादही श्री आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी मागितल्याचे बोलताना सांगितले.
सातारा जावलीचा आमदार म्हणून येथील जनतेच्या सुखदुखात कायम सहभागी होत असून तालुक्याच्या गतिमान विकासासाठी मी कायम कटीबध्द असून तालुक्यातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी श्री पिंपळेश्वराने मला बळ द्यावे अशी प्रार्थनाही यानिमित्ताने त्यांनी केली. यावेळी यात्रा समितीचे अध्यक्ष सुनिल रासकर व ग्रामस्थांच्या हस्ते आमदार भोसले यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. यावेळी यात्रे निमित्त कुडाळ गावात पुढील दोन दिवस भक्तांची प्रचंड गर्दी होणार आहे. हा उत्सव निर्विघ्नपणे साजरा होण्यासाठी सर्व भक्तांनी सहकार्य करावे असे आवाहन करून आमदार भोसले यांनी सर्व भक्तगणांना जत्रोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.