कुडाळ ता. 4 – श्रीराम नवमी निमित्त कुडाळ ता.जावली येथील युवकांच्या वतीने भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत श्रीरामांची प्रतिमा सजवलेल्या गाडीतून वाजत गाजत काढण्यात आली. यावेळी जय श्रीराम जयजय श्रीरामच्या घेषणांनी परिसर दणाणून गेला.
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या भगवान श्रीरामांच्या जन्मतिथि निमित्त कुडाळ ता.जावली येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. सर्व ग्रामस्थ व युवा वर्गाकडून या रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाचा भाग म्हणूनच भगवान श्रीरामांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. गुरूवार ता. 30 रोजी रामनवमीचे औचित्य साधून दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल यानिमित्तान पहावयास मिळाली, तसेच आशिर्वाद मंगल कार्यालय येथील मंदिरात रामजन्मोत्सव पार पडला. यावेळी राम जन्माचे किर्तनही करण्यातआहे. त्यानंतर रासणे कुटुंबियांकडून महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते,
त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता भगवान श्रीरामचंद्रांची प्रतीमेची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली,ढोल ताशांच्या गजरात तसेच डीजेच्या तालावर खेळत ही मिरवणूक निघाली. तर आठ वाजता येथील मुख्य बाजारपेठेत ग्रामपंचायत कार्यालयासमोर सामूहिक रामरक्षा पठण आणि महाआरती होऊन या उत्सवाची सांगता करण्यात आली. रामनवमी निमित्त कुडाळ गावासह संपुर्ण जावली तालुका राममय झाला. यावेळी रामभक्त व युवकांनी हाती भगवे ध्वज, भगवे फेटे परिधान करून मिरवणुकीत सहभाग घेतला. ठिकठिकाणी कुडाळकरांनी या मिरवणुकीचे स्वागत केले.मिरवणुकीतील डीजेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.