कुडाळ ता.22 – जावळी- महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीचा कार्यक्रम ता. 27 मार्च रोजी जाहीर होणार असून लगेचच उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे, निवडणुकीचा बिगुला वाजल्याने या निवडणुकीसाठी तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून या संस्थेवर आजपर्यंत तीन आमदारांचा वरदहस्त असल्याने आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे व आमदार मकरंद पाटील या तीनही आमदार आपल्या कार्यकत्यांची वर्णी लावण्यासाठी या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
जावळी- महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती जावळी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जाणारी संस्था आहे, त्यामुळे या निवडणुकीसाठी तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जावळी तालुक्यातील शेतकऱी व व्यापाऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून ओळखली जावळी कृषी उत्पन्न बाजार समिती ही स्टाँबेरी पिकासाठीही राज्यात प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर बाजार समितीने अन्य व्यापारही वाढविल्याने संस्थेची उलाढालही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे ही बाजार समिती आपल्याच ताब्यात राहावी, यासाठी आता जावली तालुक्यातील नेत्यांकडून प्रयत्न केले जाऊ लागले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेवर जावलीचे राष्ट्रवादीचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांचे वर्चस्व अबाधित आहे, मात्र गेल्या पाच वर्षात तालुक्यातील राजकीय समिकरणे पुर्णता बदलली आहेत व तालुक्याचे नेतृत्व भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे असल्याने यावेळच्या निवडणुकीत पुन्हा एकदा जावलीकरांना संघर्ष बघायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही,सध्या ही बाजार समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने संस्थेत सत्तांतर करून ती भाजपाच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकत्यांकडून होऊ शकतो,
जिल्हा बँकेतील निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा झालेला पराभव आमदार शिंदे यांच्या जिव्हारी लागल्याने, त्याची सल आजही आमदार शिंदेच्या मनात असल्याने त्याचा परिणामही येऊ घातलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत दिसून येण्याची शक्यता आहे त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, महाबळेश्वर तालुक्याचे नेतृत्व आमदार मकरंद पाटील यांच्याकडे आहे, जावली बाजार समिती ही महाबळेश्वरशी संलग्न असल्याने आमदार मकरंद पाटील यांची भुमिकाही या निवडणुकीत निर्णायक राहणार आहे, आजपर्यंत आमदार मकरंद पाटील यांनी आमदाऱ शिंदे यांना सहकार्य केले आहे मात्र जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीस आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितिन पाटील यांच्या अध्यक्षपदासाठी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सहकार्यांची भुमिका घेतल्याने त्याची परतफेड आमदार मकरंद पाटील या निवडणुकीत आमदार भोसले यांना सहकार्य करून करतील अशीही शक्यता वर्तवली जात आहे, एकुणच आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे व आमदार मकरंद पाटील या तीनही आमदार आपल्या कार्यकत्यांची वर्णी लावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे, त्यामुळे या निवडणुकीसाठी तीनही आमदारांचे राजकीय कसब पणाला लागणार आहे,बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण १८ संचालक संख्या आहे. त्यामध्ये सोसायटी विभागातून ११, ग्रामपंचायत विभागातून ४, अडते व्यापारी विभागातून २ तर हमाल मापाडी विभागातून १ अशी एकूण १८ संचालक संख्या आहे. एकंदरीत सोसायटी मतदारसंघातून 684 मतदार तर ग्रामपंचायत मतदार संघातून 1330 मतदार, आडते व्यापारी मतादारसंघातून 308 व हमाल मतदारसंघातून 8 असे एकुण 2330 मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. संस्थेच्या हीतासाठी ही निवडणुक बिनविरोध व्हावी अशी शेतकरी मतदरांची इच्छा असून निवडणुक बिनविरोध होणार का जावलीकरांना पुन्हा एकदा संघर्ष पहावयास मिळणार याविषयी तालुक्यातली जनतेमध्ये उत्सुकता लागून राहीली आहे.
जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जावळी कृषी उत्पन्न बाजार समितीची ही निवडणूक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली ताकतीने सर्व जागा लढवण्याची घोषणा जावळी महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती मालोजीराव शिंदे यांनी केली असून या निवडणुकीला ताकतीने सामोरे जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे, दिनांक 27, 28 मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे, एकूण 18 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत सर्व जागांवर सोसायटी मतदार संघ आणि ग्रामपंचायत मतदार संघातील सर्व समावेशक उमेदवार उभे करणार आहोत असेही श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सर्व जागा लढवणार – माजी उपसभापती मालोजीराव शिंदे