कुडाळ ता. 20 – प्रतापगड साखर कारखाना कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर सूरू झाला पाहीजेत यासाठी प्रतापगड कारखान्याच्या संचालक मंडळाने केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले असून प्रतापगडचा किसनवीर साखर कारखान्यासोबत सन २०१२-१३ सालापासून असलेला 16 वर्षाचा भागीदारी करार नुकताच सामंज्यसाने संपुष्टात आणला असून, प्रतापगड कारखाना आता किसनवीरच्या व्यवस्थापनाकडून मुक्त करण्यात आल्याने प्रतापगड कारखान्याने सहकारातील नावाजलेल्या व शेतकरी हित जोपासणाऱ्या सातारा येथील अंजिक्यतारा साखर कारखाऩ्यासोबत भागिदारी तत्वावर कारखाना सुरू करण्यासाठीचा पंधरा वर्षांकरिता करार केला आहे, राज्याचे साखर आयुक्त श्री. शेखर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबतची आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून दोन्ही कारखान्यांनी पुढील मान्यतेसाठी शासन दरबारी प्रस्ताव सादर केला आहे.
माजी आमदार कै लालसिंगराव शिंदे व त्यांचे सुपुत्र कै राजेंद्र शिंदे यांनी प्रतापगड साखर कारखान्याची उभारणी अल्प कालावधीत करून सन 2002-03 मध्ये कारखान्याचा पहीला चाचणी हंगाम घेतला मात्र नैसर्गिक व आर्थिक संकटामुळे कारखाना सातत्याने अडचणीत आला होता, मागील 4 वर्षांपासून बंद असलेला कारखाना आता अंजिक्यतारा साखर कारखान्याच्या मदतीने नव्या जोमाने सुरू होणार असल्याने जावळीतील शेतकरी सभासदांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत,
याबबत प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सैारभ शिंदे यांनी माहीती देताना सांगितले की, स्वर्गीय लालसिंगराव शिंदे व राजेंद्र शिंदे व इतर मंडळीचा या कारखान्यासाठी मोठा त्याग आहे. या त्यागाची जाणीव ठेवुन मी व संचालक मंडळाने कारखान्यासाठी प्रयत्न केला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्या विश्वासाने सभासदांनी आमच्यावर विश्वास दाखवून सत्ता सोपविली त्यास पात्र राहून कारखाना लवकरात लवकर सूरू करणार आहोत, किसनवीर सोबतचा करार संपुष्टात आणण्यासाठी आमदार मकरंद पाटील व नितिन पाटील यांनी मोलाचे सहकार्य करून निवडणुकीत दिलेला शब्द पाळला त्यामुळेच प्रतापगड पुन्हा जावलीकरांच्या स्वाधीन झाला, कारखाना सूरू करण्यासाठी अनेक सहकारी कारखाने व खाजगी संस्थांनी प्रस्ताव ठेवला होता मात्र जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कारखाना भागिदारी तत्वावर चालवण्यासाठी पुढाकार घेऊन सभासद शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेऊन सहकार्य करण्याची भुमिका घेतल्याने नुकताच प्रतापगड कारखाना व अजिंक्यतारा काऱखाना यांच्यामध्ये भागिदारी तत्वावरील करार पुर्ण करण्यात आला असून दोन्ही संचालक मंडळाच्याचा करारावर स्वाक्षऱ्याही झाल्या आहेत,
तसेच कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने राज्याचे साखर आयुक्त श्री. शेखर गायकवाड यांच्याकडे पुढील मान्यतेसाठी प्रस्तावही सादर केले आहेत. लवकरात लवकर कारखाना सूरू करण्याच्या दृष्टीने दोन्ही कारखान्यांचे नियोजन असून पुढील कामकाज अजिंक्यतारा हा टप्प्याटप्प्याने पूर्ण करून पुढील पंधरा वर्षे कारखाना व्यवस्थितरित्या सुरू ठेवणार आहे याबाबत कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांनी कोणतीही काळजी करू नये असे आवाहनही अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी केले आहे.
– शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार सातारा जावली
कै लालसिंगराव शिंदे व कै राजेंद्र शिंदे यांनी प्रतापगड साखर कारखाना उभारणीसाठी दिलेले बलिदान जावली तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून कदापी वाया जावू देणार नसून, येथील शेतकरी सभासदांचे हित जोपासण्याची जबाबदारी अंजिक्यतारा कारखाना पुर्ण करणार आहे. प्रतापगड अजिंक्य साखर उद्योग समूह या नावाने आगामी काळात कारखाना मोठ्या जोमाने सुरु होणार आहे. त्यामुळे कारखान्याचे सर्व कर्मचारी त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नक्की न्याय मिळेल.
– सौरभ शिंदे, अध्यक्ष प्रतापगड कारखाना
प्रतापगड व अजिंक्यतारा काऱखान्याच्या भागिदारी कराराच्या निर्णयामुळे सभासद शेतकऱ्यांमध्ये नवचैत्यन निर्माण झाले असून नक्कीच प्रतापगड कारखाना, सभासद, शेतकरी व कामगार आदी सर्वांना भविष्यात या निर्णयाचा फायदा होईल, 4 वर्षे बंद असलेला कारखाना आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या पुढाकाराने नव्या जोमाने लवकरात लवकर सुरू होऊन भविष्यात आर्थिक दृष्ट्या सक्षम देखील होईल.