सातारा- मेढा नगरपंचायतीने त्यांच्या हद्दीतील मालमत्ताची कर मुल्यनिर्धारण प्रक्रिया सुरु केली होती. मात्र नागरिकांच्या मागणीवरून या अन्यायकारक कर मुल्यनिर्धारण विरोधात आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तेव्हाच मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे सदरची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली होती आणि तेव्हाच मुख्यमंत्र्यांनी तसे तोंडी आदेशही दिले होते. त्यामुळे त्याचवेळी हि प्रक्रिया बंद करण्यात आली होती. दरम्यान, राज्याच्या नगरविकास विभागाने नुकताच रीतसर अध्यादेश काढून मेढा नगरपंचायतीच्या कर मुल्यनिर्धारण प्रक्रियेस स्थगिती दिल्याचे जाहीर केले असून आ. शिवेंद्रसिंहराजेंनी मेंढावासीयांना दिलेला शब्द पाळला असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
गेल्या काही दिवसांपासून घरपट्टी वाढीचा मुद्दा गाजत होता. मेढा नगरपंचायतीच्या हद्दीतील सर्व मिळकतधारांचा सर्व्हे पूर्ण करून करनिर्धारण यादी अंतिम करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. नागरिकांनी आंदोलनही केले होते. त्याचवेळी आ. शिवेंद्रसिंहराजेंनी नागरिकांच्या मागणीनुसार सातारा दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सातारा पालिका आणि मेढा नगरपंचायतीच्या कर मुल्यनिर्धारण प्रक्रियेस स्थगिती देण्याची मागणी केली होती. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीवरून मुख्यमंत्री ना. शिंदे यांनी त्याचवेळी सातारा पालिका आणि मेढा नगरपंचायत या दोन्ही संस्थांच्या करवाढ प्रक्रियेस स्थगिती देण्याचे तोंडी आदेश दिले आणि सदरची प्रक्रिया त्याचवेळी स्थगित करण्यात आली होती. दरम्यान, शासनाच्या कार्यालयीन प्रक्रियेनुसार मेढा नगरपंचायतीच्या कर मुल्यनिर्धारण प्रक्रियेस स्थगिती देण्याचा अध्यादेश राज्याच्या नगरविकास विभागाकडून नुकताच काढण्यात आला आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम १२४ (२) मधील तरतुदी विचारात घेऊन मेढा नगरपंचायतीने सुरु केलेल्या कर मुल्यनिर्धारण प्रक्रियेस चालू असलेल्या टप्प्यावर शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात येत असून नगरपंचायतीने सदर प्रक्रिया स्थगित ठेवून याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनास सादर करावा, असे आदेश नगर विकास विभागाचे कार्यासन अधिकारी वि. ना. धाईजे यांनी मेढा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे मेढा नगरपंचायतीच्या करवाढ प्रक्रिया स्थगिती बाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून राज्य शासनस्तरावून अध्यादेशाद्वारे स्थगिती मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. करवाढ प्रक्रियेला स्थगिती मिळवून दिल्याबद्दल नागरिकांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे आभार मानले आहेत.