कुडाळ ता.19 – (प्रतिनिधी) – कुडाळ ता. जावली व परिसरातील शाळा, महाविद्यालये, तरुण मंडळे, सामाजिक संघटना, ग्रामपंचायती, संस्थांच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती उत्साहात साजरी करण्य़ात आली. संपु्र्ण जावली तालुक्यात ठिकठिकाणी शिवजयंतीनिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
ऐतिहासिक प्रतापगड येथून तरुणाईने आणलेल्या शिवज्योतीचे गावागावांत आगमन झाल्यावर पारंपरिक वाद्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. ‘जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषाने सारा परिसर शिवमय झाला होता. चौकाचौकात भगवे झेंडे, विविध रूपातील मूर्ती, शिवरायांच्या पुतळ्याभोवती आकर्षक विद्युत रोषणाई, ध्वनिक्षेपकावर शिवशाहिरांचे पोवाडे, विविध स्पर्धा, व्याख्याने, शिबिरे, यामुळे संपु्र्ण जावली तालुका शिवमय झाला होता.
पहाटेपासून ऐतिहासिक गडावरून शिवज्योत घेऊन येणाऱ्या शिवभक्तांचे गावागावातील युवा वर्गाकडून स्वागत करण्यात आले. कुडाळ ता.जावली येथे कुडाळचा राजा सनराज, राजमाता नवरात्र उत्सव मंडळ, श्री गणेश मित्र मंडळ, चँलेंजर क्रिकेट क्लब, कुडाळ युवा मंच, मानाचा महागणपती नटराज युवक मंडळ यांच्या सहकार्याने शिवमूर्तीस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. काही गावांत संयुक्तरित्या शिवजयंती साजरी करण्यात आली होती.