मेढा – हजारो भाविकांचे श्रध्दास्थान व भक्तीस्थान असलेल्या जावली तालुक्यातील तिर्थक्षेत्र असलेल्या व नुकतेच नाचणीचे गाव म्हणून प्रसिद्धी मिळालेल्या कुसुंबी येथिल श्री काळेश्वरी देवीच्या यात्रेला आजपासून प्रारंभ होत असून पशुहत्येस बंदी असल्याने भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन श्री काळेश्वरी देवी देवस्थान ट्रस्टचे सचिव किसन चिकणे यांनी केले आहे.
मांढरदेवी येथिल काळेश्वरी देवीची बहिण असलेल्या कुसुंबीच्या काळेश्वरी देवीच्या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी असते यात्रेचा दिनांक ८ मुख्य दिवस असून दिनांक ९ रोजी सांगता दिवस आहे या यात्रेसाठी सातारा जिल्ह्यातील तसेच परजिल्हातुन भाविक मोठ्या संखेने येत असतात.
तिर्थ क्षेत्र कुसुंबी येथिल श्री काळेश्वरी देवीच्या यात्रेचा आज मुख्य दिवस असून दोन दिवस चालणाऱ्या यात्रा कालावधीत कोठेही पशुहत्या होणार नाही याची दक्षता सर्व भाविकांनी घेण्याचे आवाहन देवस्थान ट्रस्ट मार्फत करण्यात आले आहे
येथिल दोन दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी शिवतेज ग्रुप यांचे तर्फे यात्रेच्या मुख्य दिवशी व यात्रेच्या दुसऱ्या दिवसा पर्यत मोफत अन्नदान ( महाप्रसाद ) भाविकांना देण्याची सोय करण्यात आली असून शिवतेज ग्रुप हे अनेक वर्षे अन्नदानाची परंपरा अखंडीत सुरु ठेवत आहे.
जावली तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेचा उल्लेख होत असल्याने पोलीसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो. ट्रस्ट मार्फत व ग्रामपंचायत मार्फत दिवाबत्ती , पिण्याचे पाणी भाविकांना पुरविल्यात येते तसेच स्वच्छता या गोष्टीकडे लक्ष देण्यात येते. वाहनांच्या पार्किंगची तसेच छोट्या मोठ्या व्यवसायिकांच्या दुकानांची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.
यात्रा कालावधीत पशु हत्येस बंदी असल्याने यात्रेकरुंनी पशु हत्या करू नये. वाहने पार्किंग मध्ये लावावीत . अस्थाव्यस्थ लावलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे तसेच शांततेचा भंग करणाऱ्या माथेफिरुंवर पोलीसी कारवाई करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी सांगितले आहे. आरोग्य विभाग यात्रेकरूंना सेवा देण्यासाठी तत्पर ठेवण्यात आला असल्याची माहिती डॉ. आनंदराव पाटील यांनी सांगीतले आहे.