कुडाळ (प्रतिनिधी)- अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम जोमाने सुरू असून जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशानुसार शासकिय भरारी पथकाने दि.२४ जानेवारी रोजी दुपारी ३.०० वाजता कारखान्यास अचानक भेट देवून कारखान्यातील १० टनी, ३० टनी, ४० टनी व ६० टनी ऊस वजन काटयाची तपासणी केली असता ऊस वजन काटे तंतोतंत व अचूक वजन दर्शवित असल्याचा अहवाल भरारी पथकाने दिला असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांनी दिली.
शासकिय भरारी पथकामध्ये निरीक्षक वैधमापन शास्त्र अधिकारी संजय बापूराव सावंत, संजय गुलाबराव फडतरे – लेखापरिक्षक श्रेणी २ आदींचा समावेश होता. यावेळी शेतकरी प्रतिनिधी म्हणून शेंद्रे येथील प्रकाश रामचंद्र पोतेकर, अक्षय सुरेश पोतेकर हे साक्षीदार म्हणून उपस्थित होते. यावेळी कारखान्याचे शेती अधिकारी विलास पाटील, केनयार्ड सुपरवायझर प्रमोद कुंभार उपस्थित होते. शासकिय भरारी पथकाने सर्वप्रथम ट्रॅक्टर ट्रॉली क्र.एम एच २३-३०६, ट्रॅक्टर ट्रॉलीचे दोन ट्रेलर के. ए २३-२९३३, के. ए-४८-आय ६०००, एम एच ११ – बीए ३४०, ट्रॅक्टर मुंगळा क्र. ३१८१७, व ३०२४५ आदी ऊसाने भरलेल्या वाहनांचे फेर वजन करून ते बरोबर असल्याची खात्री करून घेतली. वजन काटयावर एकूण २० किलोच्या एकूण ३०० नग किलो ग्रॅम बिडाच्या चाचणी वजनाच्या सहाय्याने तपासणी केली असता सदर तपासणी मधील काटे तंतोतंत बरोबर असल्याचे व संपूर्ण ऊस वजन काटे अचूक वजन दाखवत असल्याचे सर्वांना समक्ष आढळून आले. यानंतर शासकिय भरारी पथकाने ऊस वजन काटे अचूक असल्याचे प्रमाणपत्र कारखान्यास दिले.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्या नेतृत्वाखाली कामकाज करीत असलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वजन काटयाची तपासणी ही शासनाचे वैधमापन शास्त्र, सातारा यांच्या मार्फत दरवर्षी नियमितपणे करून घेतली जाते. ऊस वजन काटे तंतोतंत वजन दर्शवित असल्याने ऊस वजनाच्या बाबतीत ऊस उत्पादक सभासद, बिगर ऊस उत्पादक सभासद शेतक-यांचा कारखान्यावर पुर्णपणे विश्वास असून, अजिंक्यतारा कारखान्याने शेतक-यांचा विश्वास सार्थ ठरविला असल्याचे कारखान्याचे चेअरमन यशवंत हरी साळुंखे व व्हाईस चेअरमन नामदेव विष्णू सावंत यांनी स्पष्ट केले.