कुडाळ ता. 24- सोनगाव ता. जावळी येथील प्रतापगड सहकारी साखर कारखाना व किसनवीर सहकारी साखर कारखान्याने सन २०१२-१३ सालापासून केलेला भागीदारी करार आज नऊ वर्षांच्या कालखंडानंतर सामंज्यसाने संपुष्टात आणला.त्यामुळे प्रतापगड कारखाना आता किसनवीरच्या व्यवस्थापनाकडून मुक्त करण्यात आल्याने प्रतापगड पुन्हा एकदा स्वतंत्र झाला आहे.
जावळीतील प्रतापगड सहकारी साखर कारखाना व वाई तालुक्यातील किसनवीर सहकारी साखर कारखान्याने सन २०१२-१३ साली भागीदारी करार करुन प्रतापगड कारखाना सहकारात टिकविण्याचे काम केले होते. शेतकरी सभासदांचा ऊस वेळेत जावा, कामगारांना १२ महिने काम मिळावे. वेळेवर पगार मिळावा या हेतुने हा करार त्यावेळच्या संचालक मंडळाने केला होता, परंतु कारखान्याचे माजी अध्यक्ष मदन भोसले यांच्या कालखंडातील मागील पाच वर्षात प्रतापगडचे तीन गळीत हंगाम किसनवीर व्यवस्थापनाने बंद ठेवले. यामुळे शेतकरी, कामगारांसह कारखान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, कारखाना चालविण्यास देण्याचा मुळ हेतूच साध्य होत नसल्यामुळे हा करार मोडण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता त्याबाबत साखर आयुक्तांकडे लवादही दाखल केला होता,
दरम्यान किसनवीरची निवडणुक लागल्याने आमदार मकरंद पाटील यांनी निवडणुकीवेळी सत्तांतर करा जावलीचा प्रतापगड जावलीकरांच्या स्वाधीन करण्याचा शब्दही दिला होता, त्यानुसार संत्तातर झाल्याने किसनवीरचे नुतन अध्यक्ष मकरंद पाटील तसेच संचालक नितीन पाटील यांनी प्रतापगडच्या व्यवस्थापनास करार सपुंष्टात आणण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करून अखेर करार संपुष्टात आणला. यावेळी किसनवीर कारखान्याचे अध्यक्ष मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितिन पाटील, किसनवीरचे संचालक तसेच प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सैारभ शिंदे, उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, दादा फरांदे, नाना पवार, आनंदराव मोहीते व संचालक मंडळ उपस्थित होते. कीसनवीर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाने केलेल्या सहकार्याबद्दल प्रतापगडच्या संचालकांनी आभारही मानले.