कुडाळ:जावळीचे शिक्षक विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे गुणवत्ता देण्याचा प्रयत्न करीत आहेत.यामुळेच येथील शिष्यवृत्ती पॅटर्न आजही महाराष्ट्रात नावारूपाला आहे. शिक्षकांचे योग्य दिशेने काम होत असल्याने आज जिल्ह्यात वेगळा लौकिक आहे.यात पालकांची भूमिका महत्वाची असून स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी सातत्य असायला हवे. सामूहिक प्रयत्नांची यासाठी आवश्यकता आहे. यादृष्टीने विद्यार्थी गुणवत्तेसाठी तालुक्यातील शिक्षकांचे कार्य मार्गदर्शक आहे.असे प्रतिपादन शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी व्यक्त केले.
मेढा ता.जावळी येथे जावली तालुका शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्यावतीने तालुक्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, सेवानिवृत्त शिक्षकांच्या गौरव कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.याप्रसंगी जावलीचे तहसीलदार राजेंद्र पोळ,शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, गटशिक्षणाधिकारी कल्पना तोडरमल, विस्तारअधिकारी चंद्रकांत कर्णे,बँकेचे चेअरमन नवनाथ जाधव,जिल्हाउपाध्यक्ष गजानन वारागडे, सरचिटणीस किरण यादव,पतसंस्था चेअरमन धिरेश गोळे,उपाध्यक्षा रंजना सपकाळ,तालुकाध्यक्ष सुरेश चिकणे,चिटणीस तानाजी आगुंडे,माजी अध्यक्ष सुरेश शेलार, शामराव जुनघरे,विजय बांदल,संपत शेलार, सर्व संचालक आदी मान्यवर उपस्थित होते.
तहसीलदार राजेंद्र पोळ म्हणाले,विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी जावलीतील शैक्षणिक कार्य प्रेरणादायी आहे.शिष्यवृत्तीत येथील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवले आहे.हा शिष्यवृत्ती पॅटर्न भविष्यातील स्पर्धा परीक्षेचा पाया आहे.सातत्याने जावळीत ही परंपरा कायम ठेवली आहे.स्पर्धा परीक्षेत जिद्द चिकाटीबरोबरच योग्य वातावरण विद्यार्थ्यांच्या यशासाठी आवश्यक आहे.यादृष्टीने त्यांना योग्य दिशा देण्याचे कार्य जावलीत होत आहे. यातून विद्यार्थ्यांचा पाया भक्कम होण्यासाठी येथील शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे.यावेळी गटशिक्षणाधिकारी कल्पना तोडरमल, शिक्षणविस्ताराधिकारी चंद्रकांत कर्णे, किरण यादव ,सुरेश चिकणे, सीमा पार्टे आदींनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी तालुक्यातील सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक,सेवानिवृत्त शिक्षक, यांचा गौरव करण्यात आला. धिरेश गोळे यांनी प्रास्ताविक केले.नितीन मोहिते यांनी सूत्रसंचालन केले.तानाजी आगुंडे यांनी आभार मानले.