मेढा प्रतिनिधी : कोयना, सोळशी, कांदाटी खोऱ्यातील १०५ गावांच्या विकासासाठी व जावली तालुक्यातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी या भागाचा पर्यटन विकास आराखडा बनवून मायभूमीचा कायापालट करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2 दिवसाच्या दरे गावच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या भागातील उत्तेश्वर देवाची यात्रा असल्याने ते सहकुटुंब उपस्थित राहिले होते..खासदार श्रीकांत शिंदे हे देखील यात्रेला उपस्थित होते. उत्तेश्वर मंदिरासमोरील असलेल्या दीपमाळेचा पहिला दिवा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लावण्यात आला.दिवा लावण्याचा मान मुख्यमंत्र्यांच्या शिंदे घराण्याला असून त्यांच्या हस्ते दिवा लावून यात्रेची सुरुवात झाली.. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावच्या यात्रेला मुख्यमंत्री आल्याने परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २ दिवसाच्या सातारा दौऱ्यावर आहेत.
जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या गावी गर्दी केली होती. सकाळपासूनच दरे गावाकडे जाण्यासाठी लोकांची गर्दी सुरू झाली. बामणोली मधून कोणी बोटीने तर कोणी तरफ्यामधून गाड्या टाकून दरेत पोहोचले. सकाळपासून मुख्यमंत्रीही येणाऱ्या सर्वांच्या अडचणी समजून घेत होते. सर्वसामान्य लोकांबरोबर राजकीय व्यक्तींनी ही आपले प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ओढा कायम गावाकडे राहिला आहे. आपल्या पदाचा कोणताही बडेजाव न करता नेहमीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्यांना वेळ देऊन आपण सर्वसामान्यांसाठीच आहोत हे कृतीतून दाखवून दिले आहे.सर्वसामान्यांमध्ये रममान झालेले एकनाथ शिंदे आज कोयनाकाठचा अभिमान बनले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरे येथे कोयना विभागातील गोगवे, वेंगळे, लाखवड, खांबिल चोरगे, रामेघर, रूळे या ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांचा सन्मान केला. जावली तालुक्यातील शिंदेवाडी , भोगवली ,वहागाव , दापवडी यांचाही सत्कार करण्यात आला
दरम्यान या सरपंचाना निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं आहे.
निवडून आलेले सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ करतील. कर्मभुमी जरी मुंबई असली तरी गाव हे जन्मभुमी आहे गावाच्या विकासासाठी कुठेही विकासनिधी कमी पडू दिला जाणार नाही असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी सूचना दिल्या.
बोंडारवाडी धरण कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले कृती समितीला उत्तर देताना लवकरच मिटिंग लावतो शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याकरीता १ टिएमसीचे धरण मंजूर करून मार्गी लावू तसेच सोळशी धरण सुद्धा मार्गी लावू
राज्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती बरोबरच आधुनिक शेतीकडे वळावे शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून शेती केल्यास शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल त्याचबरोबर रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेतीला शेतकऱ्यांनी जास्त प्राधान्य द्यावे असे आवाहन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले सेंद्रिय शेती आरोग्यासाठी चांगली आहे शिवाय त्याचा शेतकऱ्यांना मोबदला जास्त मिळतो सेंद्रिय शेतीसाठी शासनाकडून शेतकऱ्यांना मदत केली जाईल व सेंद्रिय शेतीसाठी शेतकऱ्यांच्या कार्यशाळा घेतल्या जातील, राज्याचा कृषी विभाग यासाठी प्रयत्नशील राहील असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.