जावळीजिह्वाराजकीयराज्य

बोंडारवाडी धरण प्रकल्प जलसंपदा विभागामार्फतच होणार-अधिवेशनात आमदार शिवेंद्रसिंहराजेंची लक्षवेधी

शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्यामुळे आणि ना. फडणवीस यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे बोंडारवाडी धरण प्रकल्प लवकरच मार्गी लागणार

कुडाळ ( प्रतिनिधी) दिनांक -30- जावली तालुक्यातील ५४ गावांचा शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लावण्याचा चंग बांधलेल्या आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या प्रकल्पाबाबत अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न मांडली. या प्रकल्पाची ट्रायलपीट, रेखांकन आदी बाबींसाठी जलसंपदा विभागामार्फत निधी उपलब्ध करावा आणि ५४ गावांचा सिंचनाचा प्रश्न सुटावा, यासाठी हा संपूर्ण प्रकल्प जलसंपदा विभागामार्फतच केला जावा अशी आग्रही मागणी आ. शिवेंद्रसिंहराजेंनी केली. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या लक्षवेधीला उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक उत्तर देत हा प्रकल्प जलसंपदा मार्फतच केला जाईल असे सांगितले.

हिवाळी अधिवेशनात बोंडारवाडी प्रकल्पाबाबत लक्षवेधी मांडताना आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले…पहा संपुर्ण व्हिडीआो

नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बोंडारवाडी धरण प्रकल्पाबाबत लक्षवेधी मांडली. जावली तालुक्यात कण्हेर आणि कोयना अशी दोन धरणे असूनही तालुक्यातील जनतेवर पाण्यासाठी अन्यायच होत आहे. शेतीसाठी पाणी नसल्याने तालुक्यातील तरुण माथाडी म्हणून मुंबईत स्थायिक आहे तर गावांमध्ये केवळ वयस्क लोक आणि महिलाच आहेत. तालुक्यातील ५४ गावांचा केवळ पिण्याच्या पाण्याचाच नव्हे तर, शेतीच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर असून हा प्रश्न सोडविण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प होणे अत्यावश्यक आहे. यापूर्वी केवळ पिण्याच्या पाण्यासाठी हा प्रकल्प घेण्याचे नियोजित होते, मात्र तसे करून चालणार नाही. तालुक्यातील ५४ गावांचा सिंचनाचा प्रश्नही सोडवणे आवश्यक आहे. या प्रकल्पासाठी ट्रायलपीट, रेखांकन आदींसाठी डीपीडीसीतून निधी घेण्याचा निर्णय झाला होता मात्र, डीपीडीसीतून निधी देण्यास असमर्थता दर्शवण्यात आली आहे. त्यामुळे ट्रायलपीट, रेखांकन, आराखडा आदी बाबींसाठी जलसंपदा विभागामार्फत निधी देण्यात यावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजेंनी केली.आ. शिवेंद्रसिंहराजेंनी लक्षवेधी मांडताना सविस्तर माहिती सभागृहात सादर केली.

ज्या शहिद तुकाराम ओंबळे यांनी कसाबला जीवंत पकडले त्या ओंबळे यांचे गावही या ५४ गावांमध्येच आहे. या ५४ गावांचा पाणीप्रश्न सोडवणे आवश्यक असून त्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लागला पाहिजे, हि सर्व ग्रामस्थांची मागणी आहे. हा प्रकल्प सक्षमपणे मार्गी लागण्यासाठी हा प्रकल्प जलसंपदा विभागामार्फतच व्हावा, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रश्नाला उत्तर देताना ना. फडणवीस म्हणाले की, या प्रश्नाची संपूर्ण तांत्रिक माहिती आपण घेतली असून हे धरण होऊ शकते. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार हा प्रकल्प जलसंपदा विभागामार्फत करण्यात येईल असे सांगून प्रकल्पासाठीच्या ट्रायलपीट, रेखांकन आदी कामांसाठीही जलसंपदा विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यास ना. फडणवीस यांनी सहमती दर्शवली. त्यामुळे बोंडारवाडी धरण प्रकल्पाचे काम पुढे सरकण्यातील मोठा अडसर दूर झाला आहे.आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या अथक आणि अभ्यासपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि ना. फडणवीस यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे बोंडारवाडी धरण प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे. याबाबत जावलीकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, बोंडारवाडी धरण प्रकल्प जलसंपदा विभागामार्फत करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button