कुडाळ दिनांक 27 (प्रतिनिधी) – आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून सातारा पालिका आणि मेढा नगरपंचायत हद्दीतील २१ विकासकामे मार्गी लावण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सातारा पालिका हद्दीतील ११ कामांसाठी ६ कोटी तर, मेढा नगरपंचायत हद्दीतील १० कामांसाठी ४ कोटी निधी उपलब्ध झाला आहे. सातारा आणि मेढा शहरासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
नागपूर येथे सुरु असलेल्या अधिवेशनादरम्यान आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. शिंदे आणि ना. फडणवीस यांची स्वतंत्र भेट घेऊन सातारा पालिका आणि मेढा नगरपंचायतीसाठी निधी मंजूर करून देण्याची मागणी केली होती. ना. शिंदे आणि ना. फडणवीस यांच्या सहकार्यातून राज्याच्या नगर विकास विभागामार्फत सातारा व जावली च्या २१ कामांसाठी १० कोटी निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
मेढा नगरपंचायतीसाठी मंजूर असलेल्या ४ कोटी निधीतून शहर बाजार चौक अंतर्गत सुशोभीकरण करणे व दुभाजकामधे विद्युत पोल बसविणे, मेढा शहर अंतर्गत मुस्लिम समाज दफनभूमी येथे संरक्षक भिंत व अंतर्गत सोयीसुविधा करणे, कुंभार समाज सांस्कृतिक भवन व व्यायाम शाळा बांधणे, प्रभाग क्र. १४ मध्ये नरसिंह मंदिर सभामंडप बांधणे व सुशोभीकरण करणे, मेढाशहर अंतर्गत सार्वजनिक शौचालय युनिट तयार करणे, प्रभाग क्र. १२ मध्ये संत गोरा कुंभार मंदिर ते मोहोट पुलाकडे जाणारा रस्ता येथे साकव पूल तयार करणे, शहर अंतर्गत असणारा पाझर तलाव सुशोभीकरण करणे, शहरात विविध ठिकाणी सेल्फी पॉईंट, सुशोभीकरण करणे, प्रभाग क्र. ८ मध्ये ओढ्यावर साकव पूल बांधणे, शहर अंतर्गत सार्वजनिक रस्ता खड्डे बुजवणेसह कार्पेट करणे हि कामे मार्गी लागणार आहेत. निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार पूर्ण करून तातडीने कामे सुरु करा आणि कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मेढा नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.