कुडाळ दिनांक -20 (प्रतिनिधी) – नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सातारा जावली मतदारसंघातील जावळी तालुक्यातील १५ पैकी १४ ग्रामपंचातींवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने सत्ता मिळवून आपला करिष्मा अबाधित ठेवला आहे. आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने जावळीत झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व राखत विरोधकांना अक्षरशा धूळ चारली.
जावली तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती. यातील केवळ मोरघर ग्रामपंचायत वगळता बाकीच्या १४ ग्रामपंचायतींवर आमदार शिवेंद्रसिंहराजे गटाने आपली सत्ता स्थापन केली आहे. रामवाडी, केळघर, रिटकवली, वाकी या ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या होत्या. या ग्रामपंचायतींवरही आमदार गटाने एकहाती वर्चस्व राखले. दरम्यान, निवडणूक झालेल्या रुईघर, वालुथ, करहर, ओझरे, घोटेघर, भोगवली तर्फ कुडाळ, शिंदेवाडी, आखाडे, कुसूंबी, सोमर्डी या ग्रामपंचायतींवरही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने विजय मिळवून विरोधकांना पाणी पाजले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर जावळीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार शशिकांत शिंदे या दोन्ही गटांत टोकाचा संघर्ष पहावायास मिळाला होता, काही महिन्यांपुर्वी तालुक्यात झालेल्या गावागांवातील विविध सहकारी सोसायटीच्या निवडणुकीतही त्यांचा प्रत्यय जावलीतील जनतेला आला होता, त्यामुळे राष्ट्रवादी विरूध्द भाजपा असा सामना जावलीतील जनतेला अनेकवेळा पहावयास मिळाला होता, दोन्ही आमदारांच्या संघर्षामुळे जावळी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींची निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. त्यामुळे ठिकठिकाणच्या लढती चुरशीच्या आणि लक्षवेधी होणार असा कयास बांधण्यात येत होता. त्यामुळे जावळी तालुक्यातील निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र आ. शिवेंद्रसिंहराजे गटाने विरोधकांना धूळ चारून बहुतांशी ग्रामपंचायतींवर आपली सत्ता अबाधित राखली आहे. आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटाला मोरघर या एकाच ठिकाणी सत्ता मिळवत समाधान मानावे लागले, त्यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे गटाने जावळीत विरोधकांना जोरदार धक्का दिल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. आगामी काळात जावळी कृषी उत्पन्न बाजार समितीची तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेची निवडणुक होणार असल्याने या निकालाचा परिणाम तालुक्यातील सर्व निवडणुकीतही पहावयास मिळेल असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यकत केला जात आहे.