कुडाळ दिनांक -21 (प्रतिनिधी) – जावळी तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ चांगलाच वाढल्याचे बघावयास मिळत आहे. चोरट्यांनी कुडाळ ता.जावळी येथे रविवार ता. 20 रोजीच्या मध्यरात्री शासकीय गोदामाच्या परिसरातील एक- दोन नव्हे, तर तब्बल चार ठिकाणी घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे. या चोरीमध्ये अंदाजे 25 हजारांचे साहीत्य चोरीला गेले असल्याचा अंदाज मेढा पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. एकाच रात्रीतून चोरट्यांनी परिसरातील चार घरांना लक्ष केले व पहाटेच्या सुमारास या घरफोड्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. यातील काही घरांमध्ये घर मालक हे बाहेरगावी गेल्याचे बघून चोरट्यांनी संधी साधली आहे. चोरट्यांनी कुलूप तोडून काही ठिकाणची रोकड व सोन्या चांदीच्या किरकोळ वस्तू तसेच गृहउपयोगी साहीत्य लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. जावळीचे माजी उपसभापती सौरभ शिंदे, बाळकृष्ण खटावकर, गोविंदराव शिंदे, चंद्रशेखर जोशी यांच्या बंद घराची कुलपे तोडून चोरी करण्यात आली आहे, एकाच रात्रीतून तब्बल चार ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात घरफोड्या करून चोरट्यांनी मेढा पोलिसांना आव्हानच दिले असल्याचे दिसून येत आहे.
या सर्व घरफोडया बाबत कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्याने मेढयाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करत असून, तपासादरम्यान पोलिसांनी श्वान पथकाद्वारे तसेच फिंगरप्रिंट तपासणी करून तात्काळ शोध मोहिम सुरू केली, एका ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये चोरट्यांच्या हालचाली कैद झाले आहे. या सीसीटीव्हीच्या आधारे व इतर तपास यंत्रणांच्या आधारे मेढा पोलीस चोरट्यांचा तपास करत आहे. यामुळे मेढा पोलीस या वाढत्या घरफोडयांना कशा पद्धतीने रोखणार आणि चोरट्यांच्या कशा पद्धतीने मुसक्या आवळणार याकडे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.