कुडाळ दिनांक- 8 : जावळी तालुक्यातील सोमर्डी या ठिकाणी सुरू असणाऱ्या नेताजी सुभाष चंद्र बोस वाचनालयास भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्याकडून एक लाख रुपये किमतीची पुस्तके त्यांचे निकटवर्तीय सागर पवार, राहुल पवार यांच्यामार्फत संस्थेचे संस्थापक संदीप परामणे यांच्याकडे सुपूर्द केली आहेत.
ग्रामीण भागात वाचन चळवळ वाढावी. विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच वाचनाची गोडी निर्माण व्हावी. या हेतूने सोमर्डी याठिकाणी वाचनालयाच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. याचबरोबर ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी स्व. अभयसिंहराजे भोसले स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू आहे. त्याकरिता सुसज्ज ग्रंथालय आहे.
या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षांकरीता मार्गदर्शन व अभ्यासिका उपलबध करून दिली आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी वाचनालयास भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी भेटीदरम्यान त्यांच्या कार्याचे कौतुक करून मदतीचे दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे.
समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी संस्था करत असलेले कार्य निश्चितच उल्लेखनीय आहे. आज शेतकरी-कष्टकऱ्यांच्या मुलांना याचा चांगला फायदा होत आहे. त्यांच्या या कार्यासाठी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलेली मदत निश्चित उपयोगी ठरणार आहे. यातून समाजहित साधत वाचन चळवळीला अधिक बळकटी मिळणार आहे, अशी भावना संदीप परामणे यांनी व्यक्त केली. या प्रसंगी कोलेवाडी, सोमर्डी सरपंच, ग्रामस्थ आदींची उपस्थिती होती.