कुडाळ दि. 8 : सातारा जिल्हा मजूर सहकारी संस्था फेडरेशनच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सातारा तालुक्यात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपला वरचष्मा कायम ठेवला. सहकार पॅनेलचे जयराम चव्हाण, नंदकुमार बर्गे हे दोन्ही उमेदवार विजयी झाले. जिल्ह्यात ओबीसी गटातून सुनील झोरे प्रचंड मतांनी तर महिला प्रतिनिधी म्हणून जयश्री साळुंखे या विजयी झाल्या.
कोरोनामुळे सातारा जिल्हा मजूर सहकारी संस्था फेडरेशनच्या संचालक मंडळाला एक वर्षाची मुदतवाढ मिळाली होती. कोरोना हद्दपार झाल्यानंतर अडीच महिन्यापूर्वी फेडरेशनच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची घोषणा झाली होती. या निवडणुकीत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह मान्यवरांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलने सातारा जावली तालुक्यातून दोन तर ओबीसी गट आणि महिला प्रतिनिधी म्हणून प्रत्येकी एक उमेदवार दिला होता. एकूण जिल्ह्यात २१ जागांसाठी दोन्ही पॅनेलने उमेदवार उभे केले होते. रविवार, दि.६ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेत त्या त्या तालुक्यात मतदान प्रक्रिया पार पडली. सदरबझार येथील सातारा जिल्हा मजूर सहकारी संस्थाच्या फेडरेशनच्या मतमोजणीला प्रारंभ झाला.कार्यालयात सातारा तालुक्यातून सर्वसाधारण गटासाठी जयराम चव्हाण यांना ७३, नंदकुमार बर्गे यांना ८४ मते मिळाली. दोघांनाही विजयी घोषित केले.
जिल्ह्यात ओबीसी गटातून सुनील झोरे ३३९ मतांनी तर महिला प्रतिनिधी म्हणून जयश्री साळुंखे या ३१८ मतांनी विजयी झाल्या. हे चारही उमेदवार आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे नेतृत्व मानतात. उमेदवार विजयी झाल्याची घोषणा होतात फटाक्यांची आतिषबाजी,करत गुलालाची उधळण समर्थकांनी एकच जल्लोष केला.विजयी उमेदवारांचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, राजू भोसले, वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे, जावळीचे माजी उपसभापती सैारभ बाबा शिंदे आदींनी अभिनंदन केले.