कुडाळ दिनांक – 11 – देशातील अग्रगण्य बँक असलेली बँक ऑफ महाराष्ट्र च्या कुडाळ ता जावळी येथील शाखेच्या वतीने “सतर्कता जागरूकता सप्ताह” ची सुरुवात झाली. दिनांक 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2022 या कालावधीत बँकेची सर्व कार्यालये आणि शाखा यामध्ये हा सप्ताह संपन्न होणार आहे, केंद्रीय सतर्कता आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सतर्कता जागरूकता सप्ताह साजरा केला जातो.
कुडाळ ता.जावली येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या मुख्य हाँलमध्ये “सतर्कता जागरूकता सप्ताह” 2022 अंतर्गत भ्रष्टाचार मुक्त भारत विकसित भारत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, समारंभाच्या प्रारंभी बँकेच्या सर्व कर्मचा-यांनी “सचोटीची शपथ” घेतली. या वेळी बँकेचे शाखा व्यवस्थापक सरोजकुमार गणेश भगत, बँकेचे कर्मचारी आकाश पुरूषोत्तम मस्के, मालुसू बालाजी, अस्मिता पवार, भुषण शिंदे, दिलिप गाढवे, किशोर गायकवाड, यांच्यासह माजी सरपंच विरेंद्र शिंदे, पत्रकार महेश बारटक्के, उद्योजक संदिप परामणे, दिलिप परामणे, पांडूरंग कदम, अमोल भिलारे, विनोद भिलारे, मोहन पवार, वर्षा सपकाळ, रोहीणी किर्वे, दिपाली शिंदे, संदिप धुमाळ यांच्यासह ग्रामस्थ, व्यापारी, बँकेचे खातेदार उपस्थित होते.
या प्रसंगी केंद्रीय दक्षता आयोग आणि इतर मान्यवरांकडून आलेले संदेश वाचून दाखवण्यात आले. यावेळी बोलताना बँकेचे शाखा व्यवस्थापक सरोजकुमार भगत म्हणाले, आजच्या काळात भ्रष्टाचार समाजासाठी एक कलंक आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार पहायला मिळत आहे. म्हणून भ्रष्टाचार मुक्त भारत करणे खूप आवश्यक आहे. भ्रष्टाचार हा शब्द दोन शब्दांपासून मिळून बनलेला आहे. भ्रष्ट आणि आचार यात भ्रष्ट अर्थात चुकीचा आणि आचार म्हणजे वागणूक चुकीच्या वागणुकीला भ्रष्टाचार म्हटले जाते. लाच देणे किंवा घेणे हा कायद्याने गुन्हा आहे.आजच्या व्यस्त जिवनात प्रत्येकाला लवकर यश हवे असते. या साठी काही लोक आपल्या कार्यपध्दतीत चुकीचा व गैरवापर करून भ्रष्टाचाराला खतपाणी घालतात मात्र ते चुकीचे आहे ,शासनाने भ्रष्टाचाराच्या विरुद्ध कठोर कायदे बनवले आहेत वेळप्रसंगी जागरूक राहून आवाज उठवणे व त्या कायद्यांचा अवलंब करणे गरजेचे आहे. जेव्हा आपण भ्रष्टाचार रोखण्याचा प्रयत्न करू तेव्हाच देशाची प्रगती आणि विकास होईल.
यावेळी संदिप परामणे, विरेंद्र शिंदे, महेश बारटक्के यांनी आपली मनोगते व्यक्त केली, विरेंद्र शिंदे बोलताना म्हणाले, भ्रष्ट्राचार एका संक्रामक रोगाप्रमाने देशात पसरत आहे. दिवसेंदिवस भ्रष्टाचार च्या घटना वाढत आहेत. आपल्या देशात वाढत्या भ्रष्टाचाराची अनेक कारणे आहेत. कधी कधी पैश्याच्या कमतरतेमुळेही लोक भ्रष्टाचाराच्या मार्गावर चालू लागतात. शासनाला भ्रष्टाचाराच्या विरुद्ध कठोर कायदे बनवायला हवेत. आज आपल्या देशात असे कोणतेही क्षेत्र नाही जे भ्रष्टाचार मुक्त आहे. खेडे असो किंवा शहर प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार मनुष्यातील माणुसकीला नष्ट करीत आहे. पैश्यांची आवश्यकता प्रत्येकालाच आहे परंतु याचा अर्थ असा नाही की आपण अयोग्य मार्गाने पैसे कमावणे सुरू करू. आपण सर्वांनी मिळून एक भ्रष्टाचार मुक्त समाजाची स्थापना करायला हवी. आपण भ्रष्टाचार कमी करायला प्रयत्न करू तेव्हाच देशाची प्रगती आणि विकास होईल.
यावेळी श्री आकाश मस्के यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर बँकेच्या कामकाजात गुणात्मक सुधारणा होण्यासाठी सुचवलेल्या योजनांची सक्रिय कार्यवाही करण्याचे आश्वासन बँकेचे शाखा व्यवस्थापक सरोजकुमार भगत यांनी दिले.